
मुंबई : बीड जिल्ह्यातील आश्रमशाळेतील शिक्षक धनंजय नागरगोजे यांनी आत्महत्या केली. नागरगोजे या शिक्षकाच्या आत्महत्येचे पडसाद राज्यभरात उमटत असून या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल, अशी माहिती गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी सोमवारी विधान परिषदेत दिली.
बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमी समोर आली. बीड जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी रोखणे पोलिसांसमोर आव्हान असताना दोन दिवसांपूर्वी स्वराज नगर भागातील आश्रमशाळेतील शिक्षक धनंजय नागरगोजे याने आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी फेसबूकवर तीन वर्षांच्या लहान मुलीला त्यांनी भावनिक पोस्ट लिहिली. विक्रम मुंडे, विजय मुंडे, अतुल मुंडे या संस्थाचालकांनी आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा उल्लेख त्यात असल्याचे सांगत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी स्थगन प्रस्ताव मांडला. मागील १८ महिन्यांपासून पगार दिला नाही. उलट संस्थाचालक शिक्षकाला फाशी घे आणि मोकळा हो… असा सल्ला दिला. त्यामुळे नैराश्यात गेलेल्या शिक्षकाने आत्महत्या केली. त्याला तीन वर्षांची मुलगी आहे. परंतु, आत्महत्या केल्यानंतर संस्था संचालकावर कोणताही गुन्हा का दाखल केला गेला नाही? असा संतप्त सवाल केला. तसेच शिक्षकाच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी सुमोटो गुन्हा दाखल करून घ्यावा, अशी मागणी केली. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी अंबादास दानवे यांच्या मुद्द्याला पाठिंबा देत, संबंधित संस्थाचालकांवर तत्काळ गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली. मंत्री भोयर यांनी सखोल चौकशी करून कारवाई करणार असल्याची ग्वाही दिली.
राज्यातील शाळांचे सर्वेक्षण करणार
राज्यभरात आश्रमशाळा चालवणाऱ्या संस्थाचालकांकडून सातत्याने शिक्षकांचे वेतन थकवले जाते. अशा शाळेतील सर्वेक्षण करून संस्थांचा आढावा घ्यावा, दोषी आढळणाऱ्या संस्थाचालकांवर कारवाई करावी, अशी मागणी विरोधकांनी विधान परिषदेत केली.