Dhangar Reservation : यशवंत सेनेचं २० दिवसांपासून सुरु असलेलं चौंडी येथील उपोषण अखेर मागे ; गिरीश महाजन यांच्या शिष्टाईला यश
धनगर आरक्षणासाठी(Dhangar Reservation) अहमदनगर येथील चौंडी येथे सुरु असलेलं उपोषण अखेर २१ व्या दिवशी मागे घेण्यात आलं आहे. राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्या शिष्टाईने हे उपोषण मागे घेतलं आहे. यशवंत सेनेच्या वतीने अहमदनगर जिल्ह्यातील चौडी या गावी उपोषण सुरु होतं. धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीतील आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी आंदोलन सुरु आहे.
राज्यातील धनगर समाजाला आदिवासी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावं अशी मागणी करण्यात येत आहे. त्या मागणीसाठी मागील २० दिवसांपासून अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी याठिकाणी उपोषण आंदोलन सुरु होते. आज २१ व्या दिवशी उपोषणकर्ते सुरेश बंडगर आणि अण्णासाहेब रुपनवर या दोघांची प्रकृती बिघडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल फोनवरुन चर्च करत त्यांच्या तब्यतीची विचारपूस केली होती. अखेर आज मंत्री गिरीश महाजन यांनी उपोषण कर्त्यांशी चर्चा करत त्यांना सरकारची भूमिका समजावून सांगितली. आंदोलकांचं समाधान झाल्याने अखेर उपोषण मागे घेण्यात आलं.
धनगर समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही. तोपर्यंत त्यांना आदिवासी समाजाच्या योजना लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. धनगर आरक्षणाबाबत कोणतंही ठोस आश्वासन नाही. अगोदर ठोस आश्वासन द्यावं. नाहीतर आम्ही कोणत्या आधारावर उपोषण सोडायचं. त्यामुळे आमचं उपोषण चालूच राहिलं. राज्यात चक्काजाम करण्याचा निर्णय घेतला जाईल. असं आंदोलक बाळासाहेब दोडतले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना म्हटलं.