राजू पारवेंना रामटेकमधून उमेदवारीची शक्यता

काँग्रेसकडून लोकसभा उमेदवारी निश्चितीची प्रक्रिया सुरू आहे. काँग्रेसने रविवारी रामटेक लोकसभा मतदारसंघातून नागपूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा रश्मी बर्वे यांची उमेदवारी जाहीर केली.
राजू पारवेंना रामटेकमधून उमेदवारीची शक्यता

प्रतिनिधी/मुंबई

काँग्रेसला रविवारी आणखी एक धक्का बसला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उमरेडचे काँग्रेस आमदार राजू पारवे यांना पक्षात प्रवेश देऊन ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला शह दिला आहे. पारवे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे त्यांना रामटेक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता वाढली आहे.

सध्या काँग्रेसकडून लोकसभा उमेदवारी निश्चितीची प्रक्रिया सुरू आहे. काँग्रेसने रविवारी रामटेक लोकसभा मतदारसंघातून नागपूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा रश्मी बर्वे यांची उमेदवारी जाहीर केली. ही उमेदवारी घोषित होताच पारवे यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

दुसरीकडे काँग्रेसने चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी दिली आहे. धानोरकर या दिवंगत खासदार सुरेश धानोरकर यांच्या पत्नी आहेत. सुरेश धानोरकर हे गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आलेले एकमेव खासदार होते. विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे चंद्रपूरमधून मुलगी शिवानीला उमेदवारी मिळावी म्हणून आग्रही होते. परंतु, काँग्रेसने भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या विरोधात तुम्हीच निवडणूक लढा, अशी सूचना पक्षाने वडेट्टीवार यांना केली होती. मात्र, वडेट्टीवार यांनी निवडणूक लढविण्यास असमर्थता व्यक्त केल्यावर काँग्रेसने प्रतिभा धानोरकर यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले. सध्या महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये उमेदवारांवर शिक्कामोर्तब करण्यासाठी प्रचंड दबाव आहे. त्यातच काहींना एका ठिकाणची जागा मिळाल्यावर, उमेदवार आयात करण्याची वेळ येत आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in