सुनेत्रा पवार नव्हे बारामतीतून जानकर? देवेंद्र फडणवीस -अजितदादांचा मास्टरस्ट्रोक!

महायुतीतून जानकरांची उमेदवारी पुढे येणे हा शरद पवारांना धक्का मानला जातो. आजवरच्या अजितदादांच्या हर्षवर्धन पाटील व विजय शिवतारे यांच्या पारंपरिक विरोधकांची झालेली कोंडी देखील जानकरांची उमेदवारी फोडू शकते.
सुनेत्रा पवार नव्हे बारामतीतून जानकर? देवेंद्र फडणवीस -अजितदादांचा मास्टरस्ट्रोक!

विशेष प्रतिनिधी/मुंबई

शरद पवार-उद्धव ठाकरे यांच्या अनेक राजकीय गणितांना छेद देणारी जबरदस्त राजकीय खेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजितदादा पवार यांनी केली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार म्हणून चर्चेत ठेवून शेवटच्या क्षणी धनगर समाजाचे नेते व राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक महादेव जानकर यांना उमेदवारी देण्याचे जवळजवळ नक्की झाले आहे. जानकारांची उमेदवारी हा फडणवीस-अजितदादांचा लोकसभा निवडणुकीतील मास्टरस्ट्रोक ठरणार आहे. त्याचा परिणाम, पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्याच्या राजकारणावर मोठा प्रभाव पडणार आहे.

महाविकास आघाडीचे नेते शरद पवार यांनी महादेव जानकर यांना माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याची ऑफर दिली होती. जानकर धनगर समाजाचे प्रभावशाली नेते आहेत. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच आणि मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद (धाराशिव), बीड आणि उत्तर महाराष्ट्रातील अहमदनगर दक्षिण व शिर्डी लोकसभा मतदारसंघात धनगर समाज लक्षणीय असल्याने खूप मोठे आव्हान महायुतीपुढे उभे राहणार होते. त्यामुळे शरद पवार-जानकर यांच्यात चर्चेच्या अनेक बैठका झाल्या होत्या.

बारामती मतदारसंघ निर्णायक

बारामती लोकसभा मतदारसंघात धनगर समाज बहुसंख्य आहे. या कार्डच्या जोरावरच भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर आणि महादेव जानकर यांनी त्या भागात शरद पवार-अजित पवार यांच्या विरोधात गेल्या दशकात संघर्ष केला. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत तर बारामती या शरद पवारांच्या बालेकिल्ल्यात महादेव जानकर यांनी अपक्ष निवडणूक लढवित सुप्रिया सुळे यांच्या विरोधात ४ लाख ५१ हजार ८४३ एवढी मते मिळविली होती. त्यावेळी सुप्रिया सुळे ६९ हजार ७१९ मतांनी विजयी झाल्या होत्या. त्यावेळी जानकर यांनी मतांच्या आघाडीवर विरोधकांपुढे निर्माण केलेल्या आव्हानांचा व अजितदादांनी शरद पवारांपुढे सुनेत्रा पवार यांच्या संभाव्य उमेदवारीवरून उभे केलेले आव्हान या संदर्भांचा विचार करता, महायुतीतून जानकरांची उमेदवारी पुढे येणे हा शरद पवारांना धक्का मानला जातो. आजवरच्या अजितदादांच्या हर्षवर्धन पाटील व विजय शिवतारे यांच्या पारंपरिक विरोधकांची झालेली कोंडी देखील जानकरांची उमेदवारी फोडू शकते. त्यामुळे बारामतीतील जानकर यांची उमेदवारी निर्णायक ठरणार आहे.

मोदी-शहांचा हिरवा कंदील!

गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांनी केलेल्या तीन दिल्ली दौऱ्यात महादेव जानकर यांच्या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्याशी चर्चा केल्याचे सूत्रांनी सांगितले. पंकजा मुंडे यांच्या बीड लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी निश्चितीनंतर जानकर मोहीम हाती घेण्यात आल्याचेही सूत्रांनी सांगितले.

अजितदादांवर जबाबदारी!

बारामती लोकसभा मतदारसंघात महादेव जानकर यांची उमेदवारी निश्चित झाल्यास त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी अजितदादा पवार यांच्यावरच टाकली जाणार आहे. त्यामुळे बारामतीत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या निवडणुकीच्या रिंगणात उभ्या राहणार नसल्याचे समजते.

२८ मार्च रोजी अंतिम निर्णय

राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणाऱ्या जागा व उमेदवारांच्या नावांसंदर्भात अंतिम निर्णय २८ मार्च रोजी होणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले. बारामती, रायगड, शिरूर, परभणी हे मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला महायुतीत मिळतील, असे मानले जाते. उदयनराजेंनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हावर लढण्याची तयारी दर्शविल्यास राष्ट्रवादी काँग्रेसचा महायुतीतील जागांचा वाटा पाच जागा एवढा होईल. महादेव जानकर यांना बारामतीतून उमेदवारी मिळाल्यास, राष्ट्रवादी काँग्रेसला चारच जागांवर समाधान मानावे लागेल.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in