धनगर-आदिवासींमध्ये वादाला ठिणगी; नरहरी झिरवळ यांचा धनगर आरक्षणाला विरोध, मुख्यमंत्र्यांनी बैठकीला बोलवणे अपेक्षित

मराठा आरक्षणापाठोपाठ आता धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारकडून पावले उचलली जात आहेत.
धनगर-आदिवासींमध्ये वादाला ठिणगी; नरहरी झिरवळ यांचा धनगर आरक्षणाला विरोध, मुख्यमंत्र्यांनी बैठकीला बोलवणे अपेक्षित
Published on

मुंबई : मराठा आरक्षणापाठोपाठ आता धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारकडून पावले उचलली जात आहेत. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यासंबंधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक समिती नियुक्त केली आहे. ही समिती धनगर व धनगड ही एकच जात असल्याचा शासनादेश (जीआर) काढण्यासंबंधी योग्य तो निर्णय घेईल.

धनगर समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण देणार, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी झालेल्या बैठकीत दिला होता. या निर्णयामुळे धनगर समाजात आनंदाचे वातावरण असताना राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आणि विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी अनुसूचित जमातीतून धनगर आरक्षण देण्याला विरोध केला आहे.

धनगर समाजाला आदिवासी समाजातून आरक्षण का? असा सवाल उपस्थित करत रविवारी सह्याद्री प्रतिष्ठानमध्ये पार पडलेल्या बैठकीत आम्हाला का बोलावले नाही, असा संताप नरहरी झिरवळ यांनी व्यक्त केला. दरम्यान, विधानसभा उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते नरहरी झिरवळ यांनी विरोधाची भूमिका घेतल्याने ऐन विधानसभा निवडणुकीत धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा पेटणार, अशी चिन्हे निर्माण झाली आहेत.

धनगर समाजाला आदिवासी आरक्षणातून आरक्षण देण्यास झिरवळ यांनी विरोध केला आहे. "धनगर समाजाला आरक्षण देण्यास आमची ना नाही. पण आमच्यामधून त्यांना आरक्षण का? धनगर समाजाला आदिवासीतूनच आरक्षण देण्याचा हट्ट का?" असा सवाल नरहरी झिरवळ यांनी केला आहे. झिरवाळ यांच्या या विरोधामुळे आता मराठा-ओबीसी वादानंतर धनगर-आदिवासी वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

धनगर समाजाला आरक्षण द्यावे हा मुद्दा वर्षानुवर्षे सुरूच आहे. धनगर समाजाला आरक्षण द्यावे, यावर आमचे दुमत नाही. पण आदिवासीमधून आरक्षण हवे, हा हट्ट का? सरकारला विनंती आहे. जसे त्यांना बोलावले जाते तसे आम्हालाही बोलावले पाहिजे. आमचे नेते, मंत्री आहेत, त्यांना बैठकीला बोलवायला हवे होते. मी विधानसभेचा उपाध्यक्ष असल्याने समाजाचे माझ्याकडे लक्ष आहे. सरकारच्या निर्णयाविरोधात आदिवासी आमदार, नेते, संघटना सर्व एकत्र येतील. सर्व आदिवासी नेत्यांची बैठक घेऊन पुढील भूमिका स्पष्ट करणार आहे. विरोध करायचा की न्याय मागायचा, हा निर्णय घेतला जाणार आहे, असेही नरहरी झिरवळ यांनी स्पष्ट केले.

धनगर-धनगड एकच असल्याचा दावा चुकीचा नरहरी झिरवळ यांनी यावेळी धनगर आणि धनगड या दोन्ही जाती एकच असल्याचा दावाही फेटाळला. धनगर व धनगड जात एकच आहेत. स्पेलिंग चुकल्यामुळे हा प्रकार घडल्याचा दावा केला जातो. पण त्यात कोणतेही तथ्य नाही. असे असते तर एवढी वर्षे ही गोष्ट कुणाच्याही लक्षात का आली नाही? विशेषतः यामुळे ही सूची तयार करणाऱ्याला इंग्लिश येत नसावी का? असा प्रश्न उपस्थित होतो, असेही ते म्हणाले.

परस्पर बैठक बोलावणे पूर्णतः चूक

धनगर समाजाच्या शिष्टमंडळाची परस्पर बैठक बोलावून समिती स्थापन करणे हे पूर्णतः चुकीचे आहे. ही बैठक होणार असल्याची माहिती मला अगोदरच कळली असती तर मी तिथे जाऊन बसलो असतो. भलेही मी काही बोललो नसतो, पण तिथे काय सुरू आहे, हे तरी मला समजले असते. मला तसा अधिकारही आहे, असेही झिरवळ यावेळी म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in