धारावी वाचवा, मुंबई वाचवा! धारावी गुजराती लॉबीचा पहिला घास, नंतर अख्खी मुंबई गिळण्याचा कट - संजय राऊत

उद्योगपती गौतम अदानी भाजपचे जावई आहेत. त्यामुळे भाजपने संपूर्ण मुंबईचा सातबारा त्यांच्या नावावर केला आहे.
धारावी वाचवा, मुंबई वाचवा! धारावी गुजराती लॉबीचा पहिला घास, नंतर अख्खी मुंबई गिळण्याचा कट - संजय राऊत

धारावी पुनर्विकास प्रकल्प हा या देशातील सर्वात मोठा टीडीआर घोटाळा असल्याचा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. धारावी हा पहिला घास आहे आणि त्यानंतर मुंबई गिळण्याचं गुजराती लॉबीचं फार मोठं कारस्थान आहे. गुजरात मॉडेल जबरदस्त पद्धतीने पुढे जात आहे, असा आरोपही राऊतांनी केला.

धारावीचा पूनर्विकास करण्याचा प्रकल्प अदानी समूहाकडे गेल्याने ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. याविरोधात आज मोर्चाचे देखील आयोजन केले असून धारावीतून हा मोर्चा थेट अदानींचे मुख्यालय असलेल्या बीकेसीतील कार्यालयावर जाईल. या निमित्ताने संजय राऊत यांनी शनिवारी पत्रकारांशी संवाद साधला.

धारावी प्रकल्पात देशातील सर्वात मोठा घोटाळा सुरू आहे. धारावी वाचवा म्हणजे मुंबई वाचवा. धारावी हा पहिला घास असून, त्यानंतर संपूर्ण मुंबई गिळण्याचे कारस्थान गुजराती लॉबीने रचले आहे. उद्योगपती गौतम अदानी भाजपचे जावई आहेत. त्यामुळे भाजपने संपूर्ण मुंबईचा सातबारा त्यांच्या नावावर केला आहे. धारावीत गरीब लोकांची घरे व व्यवसाय आहेत. त्यांना तिथेच जागा मिळाली पाहिजे. सरकारने हा प्रकल्प अदानींच्या घशात घालण्यापेक्षा स्वतःच त्याठिकाणी संयुक्त उपक्रम राबवावा, असे संजय राऊत म्हणाले.

गुजरातमध्ये गेल्या काही काळात सातत्याने ड्रग्जच्या खेपा येत आहेत आणि ते नंतर महाराष्ट्रात येतंय. त्यामुळे अख्खी धारावी अशा लोकांच्या हातात देत असाल तर संपूर्ण मुंबईत ड्रग्जचा व्यापार सुरू होण्याची भीती आहे. धारावीच्या पोरांना ड्रग्जच्या पुड्या विक्री करताना पहायचे आहे का? हा धारावीतील जनतेच्या तोंडाला पाने पुसून आवळा देवून कोहळा काढण्याचा प्रयत्न आहे. हा मुंबई विकण्याचा प्रयत्न आहे. देशातील सर्वांत मोठा टीडीआर घोटाळा कुठे होत असेल तर तो धारावीत पुनर्विकास प्रकल्पात होत आहे”, असा घणाघाती आरोप त्यांनी केला.

दुसरीकडे, ठाकरे गटाचा आजचा मोर्चा टीडीआर लॉबीच्या भल्यासाठी सुपारी घेऊन काढण्यात येणार असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in