तापी नदीत नवविवाहित दाम्पत्याचे मृतदेह आढळले

धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा शिवारात तापी नदीत नवविवाहित दाम्पत्याचे मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. श्याम हरी पाटील (२८) आणि सपना पाटील (२०) अशी मृतांची नावे आहेत.
तापी नदीत नवविवाहित दाम्पत्याचे मृतदेह आढळले
तापी नदीत नवविवाहित दाम्पत्याचे मृतदेह आढळले
Published on: 

जळगाव : धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा शिवारात तापी नदीत नवविवाहित दाम्पत्याचे मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. श्याम हरी पाटील (२८) आणि सपना पाटील (२०) अशी मृतांची नावे आहेत. दोघांचेही पाय लोखंडी साखळीने एकमेकांना बांधलेले असून, साखळीला मोठे कुलूप लावलेले आढळले. त्यामुळे ही आत्महत्या आहे की घातपात, याबाबत संशय व्यक्त केला जात असून, नरडाणा पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर तालुक्यातील पाडळसरे येथील मूळ रहिवासी असलेले श्याम पाटील हे काही वर्षांपूर्वी कामानिमित्त एरंडोल तालुक्यातील उत्राण येथे स्थायिक झाले होते. तेथे ते शेतीची कामे आणि ट्रॅक्टर चालवून उदरनिर्वाह करत होते. सपना हीदेखील उत्राण येथे आपल्या बहिणीकडे राहत होती. याच काळात दोघांची ओळख झाली. पुढे या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि दोघांनी प्रेमविवाह केला.

गुरुवारी दुपारी १२ ते १ वाजेच्या सुमारास नरडाणा शिवारातील तापी नदीत दोघांचे मृतदेह तरंगताना आढळून आले. घटनेची माहिती मिळताच नरडाणा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस उपनिरीक्षक सचिन कापडणीस आणि त्यांच्या पथकाने मृतदेह पाण्याबाहेर काढून पंचनामा केला. यावेळी श्याम यांचा डावा पाय आणि सपनाचा उजवा पाय लोखंडी साखळीने एकमेकांना बांधलेले असल्याचे, तसेच साखळीला कुलूप लावलेले असल्याचे निदर्शनास आले.

पोलिसांनी दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले आहेत. हे दाम्पत्य तीन ते चार दिवसांपूर्वी बाहेरगावी गेले होते, अशी माहिती समोर आली आहे. त्यानंतर त्यांचे मृतदेह तापी नदीत आढळल्याने घटनेबाबत अनेक तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत.

घटनेची माहिती मिळताच नातेवाइकांनीही घटनास्थळी गर्दी केली. शवविच्छेदन अहवाल आणि पोलीस तपासातूनच मृत्यूचे कारण व घटनेमागील नेमकी परिस्थिती स्पष्ट होणार आहे. नरडाणा पोलीस पुढील तपास करत आहेत.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in