
धुळे : वडिलोपार्जित जमिनीवरील जुन्या कालबाह्य नोंदी ७/१२ उताऱ्यावरून कमी करण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी चाळीसगाव तहसील कार्यालयातील महिला तलाठ्यासह तिघांना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पथकाने रंगेहाथ पकडले.
प्राप्त माहितीनुसार, चाळीसगाव तालुक्यातील पाथरजे येथील तक्रारदाराच्या वडिलोपार्जित शेतजमिनीवरील जुन्या नोंदी कमी करण्यासाठी अर्ज करण्यात आला होता. या अर्जावर कार्यवाही करण्यासाठी तलाठी मोमीन दिलशाद अब्दुल रहिम यांनी तक्रारदार यांना 'तुमचे काम मोठे आहे, वाडीलाल पवार यांच्याशी बोला,' असे सांगितले. त्यानुसार तक्रारदार यांनी रोजगार सेवक वाडीलाल रोहिदास पवार यांची भेट घेतली असता तलाठी मोमीन यांच्या सांगण्यानुसार २५ हजार रुपयांची मागणी करण्यात आली. तक्रारदाराने ही माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे यांना दिली. विभागाने सापळा रचून, तलाठी मोमीन, रोजगार सेवक वाडीलाल पवार आणि दादा बाबू जाधव यांना २५ हजारांची लाच स्वीकारताना तहसील कार्यालयाबाहेर रंगेहाथ पकडले. महिला तलाठी लाच प्रकरणात सापडल्याने सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे.