बोलीभाषांचे संवर्धन होणे गरजेचे,खान्देशी बोलीभाषा परिसंवादात सूर

आपल्याला आपली प्राचीन संस्कृती जपायची असल्यास सर्वप्रथम बोलीभाषांचे संवर्धन होणे गरजेचे आहे, असा सूर खान्देशी बोलीभाषा (अहिराणी, तावडी, भिल्ली, लेवा गणबोली, गुर्जर) परिसंवादात उमटला.
बोलीभाषांचे संवर्धन होणे गरजेचे,खान्देशी बोलीभाषा परिसंवादात सूर

विजय पाठक/ पूज्य साने गुरुजी साहित्य नगरी, अमळेनर

बोली भाषांना प्राचीन इतिहास आहे. अनेक बोलीभाषा काळाच्या ओघात लुप्त होत गेल्या. आपल्याला आपली प्राचीन संस्कृती जपायची असल्यास सर्वप्रथम बोलीभाषांचे संवर्धन होणे गरजेचे आहे, असा सूर खान्देशी बोलीभाषा (अहिराणी, तावडी, भिल्ली, लेवा गणबोली, गुर्जर) परिसंवादात उमटला. कविवर्य ना. धों. महानोर सभागृह, सभामंडप क्रमांक २ मध्ये पार पडलेल्या खान्देशी बोलीभाषा परिसंवादात डॉ. रमेश सूर्यवंशी (अहिराणी) कन्नड, अशोक कौतिक कोळी (तावडी)- जामनेर, डॉ. पुष्पा गावीत (भिल्ली)- धुळे, डॉ. जतीनकुमार मेढे (लेवा गणबोली)- भालोद, डॉ. सविता पटेल (गुर्जर)- नंदुरबार यांनी सहभाग घेतला. अध्यक्षस्थानी डॉ. रमेश सूर्यवंशी होते. सूत्रसंचालन शरद पाटील यांनी केले.

डॉ. सविता पटेल यांनी प्रत्येकाला आपल्या बोलीभाषेचा अभिमान असला पाहिजे, असे मत नोंदवत गुर्जर भाषेचा इतिहास व सद्यस्थितीचा आढावा घेतला. डॉ. मेढे यांनी संपूर्ण भारतात जळगाव आणि बुलढाणा जिल्ह्यातील २२० गावांमध्ये लेवा समाजाची वस्ती असल्याचे मत नोंदवले. ही भाषा उच्चारदृष्ट्या साधी आणि सोपी बोली असल्याचे सांगितले. डॉ. गावित यांनी भिल्ली बोलीभाषा अति प्राचीन असून महाभारतातही भिल्ल जमातीचा उल्लेख असल्याचे सांगितले. अशोक कौतिक कोळी यांनी तावडी भाषेचा आढावा घेत भाषेचे संवर्धन होण्याची अपेक्षा व्यक्त केली. डॉ. सूर्यवंशी यांनी अहिराणी बोलीभाषेवर बोलताना ही खान्देशची मुख्य बोलीभाषा आहे. या भाषेत गोडवा आहे. या भाषेला मोठा इतिहास असल्याचे सांगितले.

मुलाखतीतून उलगडले भटक्या विमुक्त समाजाचे दर्शन

मरीआई, नंदी बैल व पारधी समाजाला मूळ प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करत असताना त्याससमाजानेही साथ देणे गरजचे आहे. आधुनिकतेची कास धरत चंद्रावर जात असताना भटक्या विमुक्त समाजालाही समजून घेत त्यांच्या प्रगतीसाठी काम करणारे साहित्य आणि युवक तयार होणे ही काळाची गरज असल्याचे मत पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी व्यक्त केले. ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवसाच्या खान्देशकन्या बहिणाबाई चौधरी व्यासपीठाच्या पहिल्या सत्रात रवींद्र गोळे (मुंबई), सारंग दर्शने (मुंबई) यांनी त्यांची मुलाखत घेतली. त्यावेळी त्यांनी हे मत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश काटे यांनी केले.

गावात सामूहिक प्रयत्नातून ग्रामीण विकास शक्य

कोणत्याही गावाचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर संपूर्ण गावाने संघटितपणे प्रयत्न करणे गरजेचे आहे. सामूहिक प्रयत्नातूनच गावाचा विकास शक्य आहे, असे मत बारीपाडा गावाचे सुपुत्र चैत्राम पवार यांनी व्यक्त केले. अखिल भारतीय मराठी महामंडळाचे मराठी वाङ‌्मय मंडळ अमळनेरद्वारा आयोजित ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी ‌'ग्रामीण विकासाचे अर्थकारण व नियोजन' या विषयावर चैत्राम पवार यांची मुलाखत झाली. सभामंडप क्रमांक दोनमध्ये ही मुलाखत झाली. ज्येष्ठ पत्रकार आणि ज्येष्ठ कार्यकर्ते शशिकांत घासकडबी यांनी ही मुलाखत घेतली.

विनोदी साहित्याचा स्वतंत्र प्रवाह रूढ झाला नाही : परिसंवादातील खंत

पूज्य साने गुरुजी साहित्य नगरी, अमळेनर : अजूनही विनोद ऐकला जातो. विनोद वाचला जातो. विनोदामुळे रसिक, प्रेक्षक खुशही होतात. पण तरीही विनोदी साहित्यात पाहिजे तसे सकस आणि विपूल प्रमाणात लेखन झाले नाही. त्यामुळे इतर साहित्य प्रवाहाप्रमाणे विनोदी साहित्याचा स्वतंत्र प्रवाह रूढ झाला नाही, अशी खंत 'मराठी साहित्यात विनोदाचे गांभीर्याने चिंतन होणे आवश्यक आहे' या विषयावरील परिसंवादात व्यक्त करण्यात आली. सभामंडप-२ कविवर्य ना. धों. महानोर सभागृहात ‌'मराठी साहित्यात विनोदाचे गांभीर्याने चिंतन होणे आवश्यक आहे' या विषयावरील परिसंवाद झाला. अकोला येथील किशोर बळी यांनी याप्रसंगी सूत्रसंचालन केले.ठाण्याचे श्रीकांत बोजेवार अध्यक्षस्थानी होते. या परिसंवादात शिरूर ताजबंद, पुणे येथील द. मा. माने, पुणे येथील डॉ. आशुतोष जावडेकर, वणी, नाशिक येथील डॉ. दिलीप अलोणे, नंदुरबारचे प्रा. डॉ. माधव कदम यांनी सहभाग घेतला. द. मा. माने यांनी विनोदी साहित्याची वाटचाल व आढावा स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात या स्वरूपातून मांडला. डॉ. आशुतोष जावडेकर यांनी विनोदाचे प्रकार, उपहास कोटी, प्रहसन असे प्रकार सांगून नाट्यातून विनोद निर्मिती होते. परिस्थितीसापेक्ष विनोदनिर्मिती होते. मराठी भाषेबरोबरच हिंदी आणि इंग्रजी भाषेतील विनोदी लेखकांचे संदर्भ दिले.

मराठी साहित्यात तृतीयपंथीयांच्या दु:ख, व्यथा,‌ वेदनांची मांडणी व्हावी

साहित्य समाजाचा आरसा आहे. राज्यघटनेत प्रत्येकाला समान हक्क व संधी प्रदान केली आहे. असे असताना मराठी साहित्यात तृतीयपंथीय समुदायाचे चित्रण दिसून येत नाही. तसेच तृतीयपंथीयांना समान वागणूक मिळत नाही. तेव्हा मराठी साहित्यिक व लेखकांनी तृतीयपंथीय, पारलिंगी समुदायाच्या दु:ख, व्यथा, वेदना, समस्या जाणून घेऊन साहित्यात चित्रण करावे. असा आशावाद 'तृतीयपंथी समुदायाचे मराठी साहित्यातील चित्रण आणि स्थान' या विषयावरील परिसंवादात सहभागी वक्त्यांनी व्यक्त केला. मुंबई विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्राध्यापक डॉ. दीपक पवार परिसंवादाचे संवादक होते. भारत निवडणूक आयोगाच्या अखत्यारित कार्यरत असलेल्या महाराष्ट्रातील मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कविवर्य ना. धों. महानोर सभागृहात 'तृतीयपंथी समुदायाचे मराठी साहित्यातील चित्रण आणि स्थान' या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. या परिसंवादात एलजीबीटीआयक्यू समुदायाचे अभ्यासक आणि बिंदू क्वीअर राइट्स फाऊंडेशनचे अध्यक्ष बिंदुमाधव खिरे, तृतीयपंथी म्हणजेच पारलिंगी समुदायातील सामाजिक कार्यकर्त्या शमिभा पाटील, विजया वसावे, पुनीत गौडा, डॅनियल मॅक्डोन्सा आणि महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे हे सहभागी झाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in