ईडीच्या भीतीने भाजपसोबत गेलो नाही; छगन भुजबळ यांनी केले स्पष्ट,संबंधित पुस्तक वाचून कारवाईचा विचार करणार

आपण ईडीच्या भीतीने भाजपसोबत गेलो नाही, तर विकासासाठी आम्ही महायुतीसोबत गेलो, असे स्पष्ट करून राष्ट्रवादीचे (अप) नेते छगन भुजबळ यांनी, राजदीप सरदेसाई यांनी लिहिलेले पुस्तक मी स्वत: वाचणार असून, माझ्या वकिलांनादेखील देणार आहे. त्यानंतर कारवाईचा विचार करणार असल्याचे सांगितले.
छगन भुजबळ
छगन भुजबळसंग्रहीत फोटो
Published on

नाशिक : आपण ईडीच्या भीतीने भाजपसोबत गेलो नाही, तर विकासासाठी आम्ही महायुतीसोबत गेलो, असे स्पष्ट करून राष्ट्रवादीचे (अप) नेते छगन भुजबळ यांनी, राजदीप सरदेसाई यांनी लिहिलेले पुस्तक मी स्वत: वाचणार असून, माझ्या वकिलांनादेखील देणार आहे. त्यानंतर कारवाईचा विचार करणार असल्याचे सांगितले.

मी कुणालाही अशाप्रकारची मुलाखत दिलेली नाही. महाराष्ट्र सदनप्रकरणी उद्धव ठाकरे यांचे सरकार असताना क्लीनचीट मिळाली, तेव्हा मी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना पेढेदेखील दिले. आम्ही काही जेलमध्ये जाण्याच्या भीतीने सरकारमध्ये गेलो नाही, असे स्पष्ट करीत त्यांनी याबाबत आलेले वृत्त फेटाळले.

सरदेसाई यांच्या पुस्तकांमधील दावे भुजबळांनी नाकारले असून, आपण अशी कोणतीही मुलाखत दिलेली नसल्याचे स्पष्ट केले. तसेच याप्रकरणी निवडणुकीनंतर कारवाई करणार असल्याचे सांगितले. निवडणुकीच्या काळातच पुस्तक का आले? असा सवालही छगन भुजबळ यांनी उपस्थित केला आहे.

भुजबळ पुढे म्हणाले की, ‘पत्रकार राजदीप सरदेसाई यांचे पुस्तक मी पाहिलेले किंवा वाचलेले नाही. तसेच, या पुस्तकात काय प्रसिद्ध झालेले आहे ते सुद्धा मी पाहिलेले नाही. मात्र, हे पुस्तक मी घेणार आहे. तसेच, माझ्या वकिलांनाही देणार आहे. त्यानंतर वकिलांशी चर्चा करुन मी पुढील योग्य ती कार्यवाही करणार आहे, असे भुजबळ यांनी सांगितले.

सरदेसाईंच्या पुस्तकातील माहिती १०० टक्के खरी - अनिल देशमुख

राजदीप सरदेसाई यांच्या पुस्तकात जी माहिती दिली आहे, ती १०० टक्के खरी आहे. त्यात सत्यता आहे, कारण ईडी, सीबीआयच्या दबावाखाली कशा पद्धतीने अनेकांना भाजपच्या सरकारमध्ये सामील व्हावे लागले, याची सर्वांना कल्पना आहे. छगन भुजबळ यांच्यावरही दबाव होता. जेलमधून बाहेर आल्यानंतर ईडीची नोटीस आल्यानंतर पुन्हा एकदा चौकशीला सामोरे जात जेलमध्ये जाण्याची त्यांची मानसिकता नव्हती, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.

पुस्तकातील संदर्भ वृत्तामुळे वाद

राजदीप सरदेसाई यांच्या पुस्तकात, ‘भाजपसोबत महायुती सरकारमध्ये सामील होण्याचा एकच अर्थ म्हणजे ईडीपासून सुटका’, असे छगन भुजबळ यांनी म्हटल्याचा दावा करण्यात आला आहे, तर ओबीसी असल्यामुळेच माझ्यावर ईडीची कारवाई झाली, असे अनेक प्रकारचे खुलासे भुजबळ यांनी केल्याचे वृत्त आहे. सुनेत्रा पवारांच्या अटकेच्या शक्यतेने अजित पवारांना घाम फुटला होता, असा दावाही या पुस्तकात करण्यात आला आहे.

logo
marathi.freepressjournal.in