डोंबिवली : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार असे नाव नवीन पक्ष आणि तुतारी चिन्ह मिळाल्याने या चिन्हाचे अनावरण शनिवारी रायगडावर केले. यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पवार यांच्यावर टीका करत कायमच फुले-शाहू-आंबेडकर करणारे पवार छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेत नव्हते. आता शरद पवारांना छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण झाली का? आज त्यांना रायगड कसा आठवला? असा प्रश्न उपस्थित केला. डोंबिवलीत पत्रकारांशी बोलताना राज ठाकरे यांनी मराठा आरक्षण, ईव्हीएम मशीन, निवडणुकीच्या कामात शिक्षकांना काम, यावर प्रकाश टाकला.
लोकसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर कल्याण लोकसभा मतदारसंघ आणि भिवंडी लोकसभा मतदार संघाची चाचपणी करण्यासाठी शनिवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे कल्याण दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला महाराष्ट्र राज्याचा विचका होत असल्याचे मत व्यक्त केले. भविष्यात तरुण पिढी राजकारणात येण्याचा विचार करत असेल, तर जे सध्याचे राजकारण सुरू आहे, हे पाहून काय विचार करत असतील. महाराष्ट्र जे राजकारण सुरू आहे ते चांगले 'चिन्ह' नाही.
उल्हासनगरमधील पोलीस ठाण्यात गोळीबार प्रकरणावर बोलताना राज ठाकरे यांनी, आमदार गणपत गायकवाड यांनी एवढ्या टोकाची भूमिका का घेतली? त्यांची मानसिक स्थिती अशी का झाली? कोणी आणली? याचाही विचार होणे आवश्यक असून, न्यायालयात यावर निर्णय होईल.
निवडणूक आयोगाचे अधिकारी करतात काय?
महाराष्ट्रात बेरोजगारी, दुष्काळ परिस्थिती असताना, जातीचे राजकारण होत असताना दिसते. महाराष्ट्राचे वातावरण आणखी खराब होईल. पूर्वीचा महाराष्ट्र होऊ नये याकरिता जनतेने यांना वठणीवर आणले पाहिजे. शाळेतल्या शिक्षकांना निवडणूक आयोगाचे अधिकारी कामाला जुंपतात. या सगळ्यांमध्ये निवडणूक आयोगाचे अधिकारी करतात काय? ही यंत्रणा अपुरी आहे असे ते सांगतात, तर मग हे काम कसे करतात? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला.
ईव्हीएमचा घोळ आहे
मनसे महायुतीत सहभागी होण्याची चर्चा असल्याबाबत पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, व्यासपीठावर मनसे पदाधिकारी इतर पक्षांशी बोलताना दिसले याचा अर्थ ते युतीत आले असे होत नाही. यावेळी त्यांनी ईव्हीएमवर बोलताना इतरत्र सर्वच देशात बॅलेट पेपरच्या निवडणुका चालतात, तर मग भारतामध्ये अशा निवडणुका का नाही चालत. सामान्य जनता कोणाला मत देते हे सुद्धा त्यांच्या लक्षात येत नाही. मध्यंतरी काही ईव्हीएमवर स्लीप देण्यात येणार होती, असे बोलले जात होते; मात्र तेही सगळीकडे लागू पडलेले नाही. त्यामुळे ईव्हीएमचा घोळ आहे हे मी कायमच बोलत होतो. मी सगळ्या गोष्टी आधी अभ्यास करतो, त्यानंतर बोलतो, असे त्यांनी सांगितले.