भेसळ प्रकरणाशी संबंध सिद्ध झाल्यास निवृत्ती; माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांचे विरोधकांना खुले आव्हान

राज्यातील दूध भेसळ प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांना उत्तर देताना आंबेगावचे आमदार तथा माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी विरोधकांना थेट आव्हान दिले आहे.
भेसळ प्रकरणाशी संबंध सिद्ध झाल्यास निवृत्ती; माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांचे विरोधकांना खुले आव्हान
भेसळ प्रकरणाशी संबंध सिद्ध झाल्यास निवृत्ती; माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांचे विरोधकांना खुले आव्हान
Published on

रांजणी : राज्यातील दूध भेसळ प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांना उत्तर देताना आंबेगावचे आमदार तथा माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी विरोधकांना थेट आव्हान दिले आहे. दूध भेसळ किंवा कोणत्याही बेकायदेशीर व्यवहाराशी माझा प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष संबंध पुराव्यानिशी सिद्ध झाला, तर एका मिनिटाचाही विलंब न लावता सार्वजनिक जीवनातून कायमची निवृत्ती स्वीकारेन, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.

राज्यात अन्न व औषध प्रशासन (एफडीए) दूध व्यवसायाशी संबंधित विविध ठिकाणी तपासणी करून कारवाई करत असून, या कारवाईला आपला संपूर्ण पाठिंबा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भेसळ करणारी व्यक्ती, संस्था किंवा कंपनी कोणतीही असो, तिला कायद्यापासून संरक्षण मिळू नये. एफडीए आणि पोलीस यंत्रणा दोषींवर कठोर कारवाई करण्यास सक्षम आहेत. कायद्यापुढे सर्व समान आहेत, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी विरोधकांवरही टीका केली.

स्वतःचे राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी काही जण खोटे, बिनबुडाचे आणि दिशाभूल करणारे आरोप करत आहेत. जनतेची दिशाभूल करून राजकीय लाभ मिळविण्याचा हा प्रयत्न दुर्दैवी आहे, असे त्यांनी सांगितले. व्हिडीओ संदेशाला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून, या प्रकरणाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

सत्याचाच विजय होईल

आपली आणि कुटुंबीयांची जाणीवपूर्वक बदनामी थांबवली नाही, तर संबंधितांविरुद्ध उच्च न्यायालयात फौजदारी कारवाईसह अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. आपल्या दीर्घ राजकीय कारकीर्दीचा उल्लेख करताना वळसे-पाटील म्हणाले, गेली अनेक दशके जनतेच्या विश्वासाच्या बळावर मी सार्वजनिक जीवनात कार्यरत आहे. स्वच्छ, पारदर्शक आणि विकासाभिमुख राजकारण हीच माझी ओळख आहे. अफवा आणि बिनबुडाचे आरोप सत्य बदलू शकत नाहीत, सत्याचाच विजय होईल.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in