
पुणे : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळे एका गर्भवती महिलेला आपला जीव गमवावा लागल्याची घटना समोर आली होती, चौकशी अहवालातून देखील रुग्णालयावरच ठपका ठेवण्यात आला आहे. त्यानंतर पुणे महापालिकेने एक परिपत्रक काढून सरसकट अनामत रक्कम मागणे बंद करावे, असे सांगितले आहे.
पुणे महापालिकेच्या या परिपपत्रकाच्या विरोधात इंडियन मेडिकल असोसिएशन अर्थात आयएमएने आक्षेप घेतला आहे. धर्मादाय रुग्णालये सरकारच्या काही प्रमाणात सवलती घेत असल्याने त्यांच्याबाबतीत असे म्हणणे योग्य असले तरी, जी छोटी मोठी रुग्णालये चालवण्यासाठी दीर्घ कालीन आणि वारंवार होणाऱ्या खर्चासाठी अनामत रक्कम मागणे अजिबात गैर नाही, अशी भूमिका आयएमएने मांडली आहे.
पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या महिलेच्या कुटुंबीयांना दहा लाख रुपये रुग्णालयात जमा करण्याची मागणी करण्यात आली होती. कुटुंबीयांनी सुरुवातीला अडीच लाख रुपये भरण्याची तयारी देखील दाखवली, मात्र या महिलेला दाखल करून घेण्यात आलं नाही, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबाकडून करण्यात आला, त्यानंतर राज्यभरात वातावरण चांगलेच तापले. रुग्णालयाच्या विरोधात कारवाईच्या मागणीने जोर धरू लागली. यावर अनेक राजकीय मंडळींनी देखील आपली मते व्यक्त केली आहेत. त्यानंतर पुणे महापालिकेने एक परिपत्रक काढून सरसकट अनामत रक्कम घेऊ नये अशा सूचना रुग्णालयांना दिल्या.
सरकारने गल्लत करू नये
पुणे महापालिकेच्या या परिपत्रकावर मात्र आयएमएते आक्षेप घेतला आहे. पुण्यात घडलेल्या घटनेचा आयएमएकडून निषेध व्यक्त करण्यात आला आहे. तसेच या घटनेत मृत्यू पावलेल्या महिलेला श्रद्धांजली देखील वाहण्यात येत असल्याचे आयएमएचे महाराष्ट्र अध्यक्ष डॉ संतोष कदम यांनी सांगितले. चौकशीनंतर या प्रकरणातील सत्य बाहेर येईल, मात्र धर्मादाय रुग्णालये आणि इतर लहान, माध्यम स्वरूपातील रुग्णालये या दोघांमध्ये सरकारने गल्लत करू नये, असे डॉ.संतोष कदम यांनी सांगितले. दोन्ही रुग्णालयांना एकाच पारड्यात तोलू नये, यासाठी अनामत न घेण्याचा निर्णय सरसकट सर्व रुग्णालयांवर लादू नये, अशी मागणी आयएमएच्या वतीने करण्यात आली असल्याची माहिती डॉ. कदम यांनी दिली आहे.