
हिवाळी अधिवेशामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांचे निलंबन केल्यानंतर त्यांच्यावतीने माफी मागितली होती. यावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार नाराज असल्याच्या चर्चा गेले काही दिवस राजकीय वर्तुळात होत्या. विरोधीपक्ष नेते म्हणून आक्रमक भूमिका घेत नसल्याची टीका त्यांच्याच पक्षातील काही नेते करत असल्याच्या वावड्याही उठलेल्या. यावरून अजित पवारांना प्रश्न विचारला असता ते पत्रकारांवर भडकले म्हणाले, 'मी काही दुधखुळा नाही. विरोधीपक्ष नेत्याचे काम काय असते? ते मला कळते' यावरून शिंदे गटाच्या नेत्यांना त्यांना पक्षात येण्याची ऑफर दिली.
शिंदे गटाचे नेते आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर म्हणाले की, "राजकारणातही मैत्री आहे. एकमेकांबद्दल आदरही आहेच. तसेच, अजित पवार यांच्याबद्दल आम्हाला सगळ्यांना आदर आहे. ते जर आमच्यासोबत आले, तर आनंदच होईल. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांची जी घुसमट होत आहे, ते सगळेच बघत आहेत. त्यामुळे त्यांच्या सारखा उमदा नेता आमच्यासोबत आला, तर आम्हाला नक्कीच आनंद होईल." यामुळे आता राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा सुरु झाली आहे.