

मुंबई : महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांचे सर्व मोठे प्रकल्प साडेतीन वर्षांच्या आत पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी शासकीय यंत्रणांना दिले आहेत. कंत्राटदारांकडून होणारा विलंब कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही. अशा कंत्राटदारांवर थेट कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
प्रकल्प विलंबामुळे राज्याचे आणि देशाचे मोठे आर्थिक नुकसान होते, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. मुंबईतील ‘सह्याद्री’ अतिथीगृहावर आयोजित पायाभूत सुविधा वॉर रूमच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यापुढे निविदेच्या अटींमध्ये कंत्राटदारांचा पूर्वीचा रेकॉर्ड तपासला जावा आणि आधीच्या कामांना विलंब करणाऱ्या कंत्राटदारांना नवीन प्रकल्प देऊ नयेत, अशा सूचना त्यांनी विविध विभागांना दिल्या. राज्याच्या आर्थिक विकासाला गती देण्यासाठी प्रकल्पांच्या मार्गातील सर्व अडथळे दूर करून ते वेळेत पूर्ण करण्यावर त्यांनी भर दिला.
या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा आढावा घेतला. धारावीतील स्थानिक उद्योजकांना बळ देण्यासाठी आणि तेथील अनौपचारिक अर्थव्यवस्थेला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य जीएसटी सवलत देण्याबाबत तत्काळ कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले. या प्रकल्पातील प्रलंबित प्रश्न विविध विभागांच्या समन्वयाने सोडवण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच ना. म. जोशी मार्ग, नायगाव आणि वरळी येथील बीडीडी चाळ पुनर्विकासअंतर्गत पात्र रहिवाशांना भाडे दिल्यानंतर सध्याच्या घरांचा ताबा विनाविलंब घेऊन कामाला गती देण्याचे आदेश त्यांनी दिले.
याशिवाय ठाणे ते बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्प ठरवून दिलेल्या वेळेत आणि गोरेगाव ते मुलुंड दुहेरी बोगदा प्रकल्प जानेवारी २०२९ पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. वांद्रे ते वर्सोवा सी लिंकच्या कामाला गती देण्यासोबतच या प्रकल्पांसाठी इंधनाचा पुरवठा विनाव्यत्यय सुरू ठेवण्यास त्यांनी सांगितले.
विरार ते अलिबाग मल्टि-मोड कॉरिडॉरसाठी जमीन संपादन प्रक्रियेला वेग देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. या प्रकल्पाच्या माध्यमातून जमिनीच्या वाढणाऱ्या मूल्यांचा लाभ मिळवण्यासाठी योग्य नियोजन यंत्रणा तयार करण्याची सूचना त्यांनी केली. तसेच या कॉरिडॉरच्या बाजूला गुंतवणूकदारांच्या सहभागातून औद्योगिक विकासासाठी विशेष क्षेत्रे निश्चित करण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला.
विविध प्रकल्पांचा घेतला आढावा
या बैठकीत मुंबई मेट्रो मार्गिका २बी, ४, ५, ६, ७ए आणि ९ सह शिवडी ते वरळी उन्नत मार्ग, पुणे मेट्रो मार्गिका ३, मुळा मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्प, पुणे रिंग रोड, गोरेगाव ते मुलुंड लिंक रोड आणि धारावी पुनर्विकास अशा अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.