मुंबई : राज्य सरकारची महत्त्वाची योजना ‘लाडकी बहीण योजना’ सुरू झाल्यानंतर महिलांच्या खात्यात प्रत्येकी ३ हजार रुपये जमा होत आहेत. हे पैसे काढायला ‘लाडक्या बहिणीं’ची बँकेत तुफान गर्दी होत असल्याने बँक कर्मचाऱ्यांच्या नाकीनऊ आले आहेत. या गर्दीमुळे कर्मचाऱ्यांना अधिकचे काम करावे लागत आहे. त्यामुळे बँकेमध्ये अतिरिक्त मनुष्यबळ द्यावे व सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी बँक कर्मचारी संघटनांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून केली आहे.
‘लाडकी बहीण योजने’ची सुरुवात १७ ऑगस्टपासून झाली. गेल्या महिन्याभरापासून या योजनेचे फॉर्म भरून घेतले जात होते. आतापर्यंत ९० लाख महिलांना या योजनेचे पैसे मिळाले आहेत. हे पैसे काढायला बँकेत शनिवारपासून तुफान गर्दी होत आहे. बँकेत नवीन खाती उघडायला अनेक महिला धाव घेत आहेत. त्यामुळे बँक कर्मचाऱ्यांचे काम वाढले आहे. तसेच कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून अतिरिक्त कर्मचारी देण्याची विनंती केली.
युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनचे संयोजक देवीदास तुळजापूरकर यांनी या योजनेमुळे बँक कर्मचाऱ्यांना नवीन अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे पत्रात नमूद केले. आतापर्यंत २० टक्के बँक खातीही आधारला जोडलेली नाहीत. त्यामुळे त्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही. ही बँक खाती आधारला जोडण्यासाठी महिलांची गर्दी वाढली आहे. त्यामुळे बँकांमध्ये गर्दी वाढली.
तसेच अनेक जनधन खाती आता बचत खात्यात परावर्तीत केली आहेत. त्यांना एसएमएस सेवा शुल्क, किमान बचत रक्कम शुल्क, एटीएम शुल्क, ईसीएस शुल्क, चेक बाऊन्स चार्जेस आदी लागत आहे. या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे आल्यानंतर बँक खात्यातून बँक आपले दंड आपोआप वसूल करत आहे. त्यामुळे त्या खात्यात शिल्लक रक्कम कमी दिसत आहे. मात्र, खातेदार बँक कर्मचाऱ्यांशी या मुद्द्यावरून भांडत आहेत, तर काही खातेदार हे कर्जबुडवे असल्याने त्यांची खाती ब्लॉक झाली आहेत. त्यामुळे त्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही. त्यामुळे बँक शाखेत येऊन हे खातेदार बँक कर्मचाऱ्यांशी वाद घालत आहेत. तसेच खातेदार हिंसक होण्याचे प्रमाण वाढले असून त्याचा फटका कर्मचाऱ्यांना बसत आहे, असे तुळजापूरकर यांनी सांगितले.
बँक कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण पाहता अतिरिक्त मनुष्यबळ पुरवावे, तसेच सुरक्षेच्या अतिरिक्त कर्मचारी द्यावेत. याबाबत तातडीने पावले न उचलल्यास आणखी गोंधळ निर्माण होईल, असा इशारा त्यांनी दिला.
या योजनेत आतापर्यंत १.६ कोटी अर्ज आले असून ९६ लाख महिलांना दोन हप्त्यांचे वाटप झाले आहे.