महायुतीतही अनेक जागांवरून मतभेद; रायगडमध्ये तटकरे-भाजप नेते आमनेसामने
विशेष प्रतिनिधी/मुंबई: एकीकडे महाविकास आघाडीचे चर्चेचे गुऱ्हाळ सुरू आहे. मात्र, दुसरीकडे महायुतीतही जागावाटपावरून धुसफूस सुरूच आहे. एकीकडे महायुतीचे नेते कामाला लागलेले आहेत. परंतु या दरम्यान मतभेदही चव्हाट्यावर येत आहेत. रायगडची जागा तर हिटलिस्टवर आहे. एक तर रायगडचे विद्यमान खासदार सुनील तटकरे यांना शिंदे गटाचे आव्हान आहे. मात्र, दुसरीकडे भाजपनेही या जागेवर दावा ठोकला आहे. त्यामुळे तटकरे यांची चांगलीच गोची झाली आहे. यासोबतच इतरत्रही बऱ्याच जागांवर वाद होण्याची चिन्हे आहेत.
रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद जशी मोठी आहे, तशीच शिवसेना शिंदे गट आणि भाजपची ताकद आहे. त्यामुळे जिल्ह्यात कुरघोडीचे राजकारण होण्याची शक्यता वाढली आहे. खा. सुनील तटकरे यांना शिंदे गटाचा आधीच विरोध आहे. विशेषत: मंत्री अदिती तटकरे यांना रायगडचे पालक मंत्रीपद देऊ नये, यासाठी शिंदे गटाच्या आमदारांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. आता लोकसभा निवडणुकीच्या पुढे थेट भाजपनेच तटकरेंसमोर आव्हान उभे केले आहे. स्थानिक भाजप नेत्यांनी रायगडवरून कडेलोट करून आम्ही आगामी लोकसभा जिंकू, असे आव्हानच भाजप नेत्यांनी खा. तटकरे यांना दिले.
त्यामुळे जिल्ह्यात अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना विरोध वाढला आहे. त्यामुळे तटकरे यांची आगामी काळात कोंडी होण्याची शक्यता आहे. यातून मार्ग काढण्यासाठी ते प्रयत्नशील असून, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा दाखला देऊन आपली वाट मोकळी करू पाहात आहेत. मात्र, स्थानिक नेत्यांचा विरोध आगामी लोकसभा निवडणुकीत तटकरे यांच्या अंगाशी येण्याची शक्यता राजकीय तज्ज्ञ बोलून दाखवत आहेत.
सुनील तटकरे हे रायगडचे विद्यमान खासदार आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत त्यांनाच उमेदवारी मिळेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यांच्यासमोर ठाकरे गटाचे अनंत गीते पुन्हा मैदानात उतरणार आहेत. त्यामुळे या दोघांमध्येच पुन्हा लढत रंगण्याची चिन्हे आहेत. अनंत गीते यांनी पुन्हा मोर्चेबांधणी केली आहे. मात्र, शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडल्याने त्याचा फटका त्यांना बसू शकतो, असे बोलले जात आहे. मात्र, त्यांच्यापेक्षा तटकरे यांच्यासमोर मोठे आव्हान उभे ठाकण्याची शक्यता आहे. कारण एक तर शिंदे गटाचा खा. सुनील तटकरे आणि मंत्री अदिती तटकरे यांना विरोध आहे. दुसरीकडे भाजपचे स्थानिक नेतेही त्यांना विरोध करीत आहेत. त्यामुळे ही अंतर्गत धुसफूस तटकरे यांना चांगलीच महागात पडू शकते, असे बोलले जात आहे.
शहा, फडणवीस तटकरेंना तारणार?
भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या प्रखर विरोधामुळे खा. सुनील तटकरे यांची चांगलीच गोची झाली आहे. त्यामुळे तटकरे यांनी शनिवारी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राज्याचे भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नावे सांगत एक प्रकारे स्थानिक भाजप नेत्यांना धमकी दिली आहे. जिल्ह्यातील काही स्थानिक भाजप नेते माझ्या विरोधात बोलत आहेत. परंतु याची दखल भाजपच्या वरिष्ठांकडून घेतली जाईल, असे तटकरे म्हणाले. त्यामुळे हा वाद ऐन निवडणुकीत चिघळू शकतो.