ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे सवलतीबाबत निराशा कायम ; कोरोनाकाळापासून सवलती बंद असल्याने नागरिकांना भुर्दंड

कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर झाला होता. त्याचा फटका रेल्वेच्या महसुलालाही बसला. रेल्वे मंत्रालयाच्या उत्तरानुसार...
ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे सवलतीबाबत निराशा कायम ; कोरोनाकाळापासून सवलती बंद असल्याने नागरिकांना भुर्दंड
Published on

कोरोनाची तिसरी लाट ओसरल्यानंतर रेल्वे गाडय़ांना असलेला विशेष दर्जा काढून त्या नियमितपणे चालवण्यास सुरुवात झाली. अनारक्षित गाडय़ाही रुळावर आल्या. मात्र ज्येष्ठ नागरिकांना असलेली सवलत अद्याप बंद असल्याचे निदर्शनास येत आहे. ज्येष्ठ नागरिकांना भाड्यामध्ये मिळणाऱ्या सवलतीवर कोरोनाकाळात लागू केलेले निर्बंध अजून काही काळ कायम राहणारअसल्याचे रेल्वे प्रशासनाकडून बोलले जात असल्याने ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे सवलतीसाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. मात्र दुसऱ्या बाजूला सवलत लागू नसल्याने ज्येष्ठाना उतरत्या वयात आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

मार्च २०२० पासून कोरोनाची लाट सुरू होताच रेल्वे प्रवासावर निर्बंध आले. रेल्वेगाडय़ांना गर्दी होऊ नये, यासाठी कोरोनात ज्येष्ठ नागरिकांची सवलत तात्पुरती बंद करण्यात आली. मात्र वैद्यकीय कारणास्तव प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सवलत सुरूच ठेवली. अशा अकरा सवलती सुरूच आहे. कोरोनामध्ये बंद असलेली मेल, एक्सप्रेसमधील अनारक्षित तिकीट सेवाही नुकतीच सुरू केली. तर यात पास प्रवासाचीही मुभा दिली. मात्र ज्येष्ठ नागरिकांच्या बंद असलेल्या सवलतीचा विचार होत नाही. रेल्वे मंत्रालयाकडून तिकिटांवर विविध प्रकारच्या ५१ सवलती दिल्या जातात. कोरोना सुरू होताच या सवलती बंद करण्यात आल्या. यामध्ये दिव्यांग, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, पुरस्कारप्राप्त व्यक्ती, खेळाडू आदींचा समावेश आहे. दरम्यान, याबाबत रेल्वे मंत्रालय निर्णय घेणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

रेल्वेचे म्हणणे काय?

कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर झाला होता. त्याचा फटका रेल्वेच्या महसुलालाही बसला. रेल्वे मंत्रालयाच्या उत्तरानुसार २०१९-२० आ आर्थिक वर्षाच्या तुलनेत २०२०-२१ या आर्थिक वर्षामध्ये रेल्वेच्या प्रवासी वाहतुकीतून येणाऱ्या उत्पन्नात घट झाली होती. रेल्वे प्रशासनाने सांगितले की, तिकिटावर मिळणाऱ्या सवलतीचा बोजा हा रेल्वेवर पडत असतो. अशा परिस्थितीत ज्येष्ठ नागरिकांसह काही अन्य वर्गातील प्रवाशांना तिकिटावर मिळणाऱ्या सवतलीवरील निर्बंध कायम राहणार आहेत.

logo
marathi.freepressjournal.in