कंत्राटी भरतीद्वारे महायुतीकडून अपेक्षाभंग; पटोले यांचा आरोप; आंदोलनाचा इशारा

राज्यात महागाई बेरोजगारी झपाट्याने वाढत आहेत. तरुण रोजगाराच्या प्रतीक्षेत असताना राज्यात जवळपास २.५ लाख सरकारी पदे रिक्त आहेत. विविध विभागातील मागासवर्गिय पदांचा अनुशेषही भरला नाही.
 नाना पटोले  यांचे संग्रहित छायाचित्र
नाना पटोले यांचे संग्रहित छायाचित्रएक्स
Published on

मुंबई : राज्यात महागाई बेरोजगारी झपाट्याने वाढत आहेत. तरुण रोजगाराच्या प्रतीक्षेत असताना राज्यात जवळपास २.५ लाख सरकारी पदे रिक्त आहेत. विविध विभागातील मागासवर्गिय पदांचा अनुशेषही भरला नाही. बेरोजगारांची मोठी फौज राज्यात असून लाखो तरुण मुले मुली नोकरीची अपेक्षेने वाट पहात असताना सरकारने पुन्हा एकदा कंत्राटी भरती सुरु करून सुशिक्षित तरुणांना नोकर भरतीच्या दिलेल्या आश्वासनाला हरताळ फासला आहे. काँग्रेस पक्षाचा कंत्राटी नोकर भरतीला तीव्र विरोध असून ही भरती रद्द करा अन्यथा रस्त्यावर उतरु, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे.

कंत्राटी पद्धतीने नोकर भरती करण्यास काँग्रेस पक्षाचा तीव्र विरोध आहे. याप्रश्नी काँग्रेस पक्ष नेहमीच तरुण मुलांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलेला आहे. यापूर्वी भाजपा युती सरकारने सुरु केलेल्या कंत्राटी पद्धतीच्या नोकर भरतीला तीव्र विरोध केला होता. मागील सरकारमधील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंत्राटी भरती करणार नाही असे जाहीर करून ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी कंत्राटी भरतीचा निर्णय रद्द केला होता. यानंतरही आरोग्य विभाग व एमपीएससीच्या माध्यमातून कंत्राटी पद्धतीने लिपीक व टंकलेखक भरण्यास सरकारने परवानगी दिली होती. भारतीय जनता पक्षाच्या करनी व कथनीत फरक असतो. आताही अमरावती जिल्हा सत्र न्यायालय व एस. टी. महामंडळ यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी विभागीय कार्यालयात कंत्राटी पद्धतीने नोकर भरती करण्यासाठी जाहिरात दिली आहे. भाजपा युती सरकारच्या काळात तहसीलदार व नायब तहसीलदार पदाचीही कंत्राटी भरती करण्याची जाहिरात प्रसिद्ध केली होती.

निवडणूक पार पडून अजून सरकारची स्थापनाही झालेली नाही तरी लगेच एस. टी. महामंडळाने तिकटांचे दर वाढवून जनतेच्या खिशाला कात्री लावण्यास सुरुवात केली आहे. भाजपा सरकारने आतापासूनच जनतेला लुटण्याचे काम सुरु केले असून कंत्राटी भरती व एसटी भाडेवाढ पाहता हे सरकार लाडक्या बहिणीला २१०० रुपये, शेतकऱ्यांची कर्जमाफी, वीज माफी, शेतमालाला हमीभाव देतील, असे वाटत नाही, असा टोला नाना पटोले यांनी लगावला.

logo
marathi.freepressjournal.in