मुंबई : एकीकडे ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’चा बोलबाला सुरू असतानाच, आता राज्याला महिला मुख्यमंत्री मिळणार, अशी जोरदार चर्चा सुरू आहे. काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनीच तसे संकेत दिले आहेत. मुख्यमंत्रीपदासाठी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या रश्मी ठाकरे यांचीही नावे घेतली आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात आता चर्चेला नवा विषय मिळाला आहे.
“महाराष्ट्राची मुख्यमंत्री महिला झाली तर आपल्याला अतिशय आनंद होईल. महाराष्ट्र पुरोगामी आणि प्रगत राज्य म्हणून ओळखले जाते. त्यातच महत्त्वाची बाब म्हणजे, आता आपण ५० टक्के आरक्षणही लागू केले आहे. महाविकास आघाडीतील सर्व पक्षांकडे मुख्यमंत्रिपदासाठी महिलांचे चेहरे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये सुप्रिया सुळे तर ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये रश्मी ठाकरे आहेत. आमच्या काँग्रेस पक्षातही महिला नेतेमंडळी आहेत. पण त्याबाबतचा निर्णय निवडून आलेली आमदार मंडळी घेत असतात,” असे सांगत वर्षा गायकवाड यांनी राज्याला महिला मुख्यमंत्री मिळणार असल्याच्या चर्चेला दुजोरा दिला आहे. महाविकास आघाडीत महिला नेत्यांचा सन्मान होतो. पण भाजपमध्ये एकाही महिला नेत्याला मंत्रिपद दिले जात नाही. तसेच अध्यक्षपददेखील दिले जात नाही, अशी टीकाही त्यांनी केली. काँग्रेसमध्ये धडाडीच्या नेत्या म्हणून यशोमती ठाकूर, वर्षा गायकवाड, प्रणिती शिंदे, प्रतिभा धानोरकर, शोभा बच्छाव यांच्याकडे पाहिले जात आहे. देश स्वतंत्र झाल्यापासून भारतात आतापर्यंत फक्त १६ महिला मुख्यमंत्री झालेल्या आहेत. त्यापैकी महिला मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणात एकाही महिलेला स्थान मिळालेले नाही. उलट महिला धोरण स्वीकारणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे. त्यामुळे राज्याला महिला मुख्यमंत्र्याची आस लागून राहिलेली आहे. महाविकास आघाडीसह महायुतीमध्येही राज्याचे नेतृत्व करण्याची क्षमता महिला नेत्यांमध्ये आहे. मात्र महिलांना मुख्यमंत्रीपदाचे स्थान देण्यामध्ये कुठेतरी राज्याच्या राजकारणामध्ये उदासीनता पाहायला मिळत आहे.
वर्षभरापूर्वी उद्धव ठाकरे यांनी, ‘जर आमची सत्ता आली तर शिवसेनेचा पुढचा मुख्यमंत्री ही महिला असेल,’ असे विधान केले होते. त्यात आता वर्षा गायकवाड यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हे विधान केल्यामुळे त्यात आणखी भर पडली आहे.
आमच्या मनातले मुख्यमंत्री फडणवीसच - गिरीश महाजन
मुख्यमंत्रिपदासाठी भाजपमध्ये एकमेव चेहरा आहे आणि तो म्हणजे देवेंद्र फडणवीस. जर भाजपचा मुख्यमंत्री होत असेल तर देवेंद्रजीच होतील. पक्षश्रेष्ठीना सर्व अधिकार आहेत, असे गिरीश महाजन यांनी नांदेडमध्ये सांगितले. येत्या १५ ते २० दिवसांत राज्यात आचारसंहिता लागू करण्यात येणार आहे. तसेच विधानसभा निवडणुकीत राज्यामध्ये महायुतीचाच विजय होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
सुप्रियाला संसदेत रस - शरद पवार
माझ्या मते, सुप्रिया यांना संसदेत जास्त इंटरेस्ट आहे. खासदार म्हणून काम करण्याची त्यांना आस्था आहे. त्यांची संसदेतील उपस्थिती ९५ टक्क्यांच्या पुढे असते. नुसती उपस्थिती जास्त असते असे नाही, तर त्या ११ वाजता सभागृहात गेल्यानंतर सभागृह संपेपर्यंत त्यांची उपस्थिती असते. अनेक प्रश्नांवरील चर्चेत सहभागी होण्यावर तिचे अधिक लक्ष असते. संसद सदस्य म्हणून तिचे रँकिंग जास्त आहे. राज्यातील सत्ताकेंद्रांमध्ये तिला फार आस्था आहे, असे मला वाटत नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सांगितले.