एकनाथ खडसे दिल्लीत दाखल; भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा

मुख्यमंत्रीपद न मिळाल्याने नाराज असलेल्या एकनाथ खडसेंनी काही काळ राजकीय विजनवासात घालवल्यानंतर खडसे हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात दाखल झाले. मात्र, ते तिथे रमले नाहीत. त्यामुळे खडसेंच्या भाजप ‘घरवापसी’ची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे.
एकनाथ खडसे दिल्लीत दाखल; भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे अचानक दिल्लीला रवाना झाल्याने ते भाजपमध्ये परतणार असल्याची जोरदार चर्चा राज्यात सुरू झाली आहे. अडीच वर्षांपूर्वी भाजपची साथ सोडून राष्ट्रवादीत गेलेल्या खडसेंची उणीव भाजपला या निवडणुकीत चांगलीच जाणवत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे त्यांच्या तातडीने दिल्लीला जाण्याचा संदर्भ त्यांच्या संभाव्य पक्षबदलाशी लावला जात आहे.

मुख्यमंत्रीपद न मिळाल्याने नाराज असलेल्या एकनाथ खडसेंनी काही काळ राजकीय विजनवासात घालवल्यानंतर खडसे हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात दाखल झाले. मात्र, ते तिथे रमले नाहीत. त्यामुळे खडसेंच्या भाजप ‘घरवापसी’ची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. नाथाभाऊ यांनी पुन्हा भाजपमध्ये यावे, असे सूतोवाच आणि इच्छा खुद्द त्यांच्या स्नुषा आणि भाजप खासदार रक्षा खडसे यांनीही काही दिवसांपूर्वी बोलून दाखविली होती.

दरम्यान, भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांनीही एकनाथ खडसे हे भाजपमध्ये येण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे जाहीररीत्या सांगितले होते. त्यावर मी राष्ट्रवादीमध्येच राहणार. माझे राजकीय करिअर संपण्याच्या मार्गावर असताना मला शरद पवार यांनी साथ देऊन विधान परिषदेचा आमदार केले. त्यामुळे मी पक्षबदल करणार नाही आणि मी भाजपमध्ये गेलो तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांना सांगूनच जाईन, असे खडसे यांनी वारंवार सांगितले. याचा अर्थ मी पक्ष बदलणारच नाही असा होत नाही, तर पक्षश्रेष्ठींना विचारून जाईन, असे खडसे म्हणाले होते.

आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर गेल्या काही दिवसांत खडसे परिवाराला गौण खनिजप्रकरणी १२७ कोटींच्या वसुलीला मिळालेली स्थगिती, रक्षा खडसे यांना लोकसभेची मिळालेली उमेदवारी, भोसरी भूखंडप्रकरणी जामीन मंजूर होणे आदी घटना खडसेंविषयी भाजप नेत्यांचे मनपरिवर्तन झाल्याचे द्योतक मानले जाते.

logo
marathi.freepressjournal.in