महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त, शरद पवार व बाळासाहेब लांडगे यांना मोठा धक्का

भारतीय कुस्ती महासंघाकडून दिलेल्या सुचनांचे पालन महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेतर्फे केले जात नव्हते.
 महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त, शरद पवार व  बाळासाहेब लांडगे यांना मोठा धक्का

महाराष्ट्रातील कुस्तीची पालक संघटना असलेली महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त करण्याचा निर्णय भारतीय कुस्ती महासंघाने घेतला आहे. अनेक जिल्हा संघटना व खेळाडूंच्या तक्रारींमुळे महासंघाच्या नवी दिल्ली येथे झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे आजीवन अध्यक्ष खासदार शरद पवार व सरचिटणीस प्रा. बाळासाहेब लांडगे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेला महासंघाने २३ आणि १५ वर्षांखालील दोन राष्ट्रीय स्पर्धेचे यजमानपद दिले होते. मात्र, परिषदेने यापैकी एकही स्पर्धा आयोजित केली नाही. त्यामुळे महासंघाने परिषदेला संलग्नता रद्द करण्याचा इशाराही दिला. तरी परिषदेने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे ही कारवाई केल्याचे भारतीय कुस्ती महासंघातर्फे सांगण्यात आले आहे.

“भारतीय कुस्ती महासंघाकडून दिलेल्या सुचनांचे पालन महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेतर्फे केले जात नव्हते. त्यांच्या कारभाराबद्दल अनेक जिल्हा संघटनांनी आमच्याकडे तक्रारी पाठवल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला. आम्ही हंगामी समितीची नियुक्ती करणार आहेत,” असे भारतीय कुस्ती महासंघाचे सहाय्यक सचिव विनोद तोमर यांनी सांगितले. राज्य कुस्तीगीर परिषदेचा गेल्या ३० वर्षापासून कारभार पाहणारे सरचिटणीस प्रा. बाळासाहेब लांडगे यांच्याविरोधात भारतीय कुस्ती महासंघाकडे अनेक तक्रारी आल्या आहेत. त्यांच्या एकहाती मनमानी कारभारामुळे अनेक जिल्हा संघटना व पदाधिकारी त्रस्त आहेत. एकाच जिल्ह्यात दोन संघटना चालवणे, त्यांच्यातील वाद न सोडवणे, खेळाडूंकडे दुर्लक्ष करणे, पदाधिकाऱ्यांना विचारात न घेणे आदी गोष्टींमुळे राज्यातील कुस्तीक्षेत्रात वाद सुरू आहेत, अशा तक्रारी त्यांच्याविरोधात करण्यात आल्या होत्या.

कुस्ती परिषदेला दुसरा धक्का

महाराष्ट्र राज्य कुस्तीगिर परिषदेचे अध्यक्ष शरद पवार व बाळासाहेब लांडगे यांच्यासाठी हा अवघ्या १२ दिवसांत दुसरा धक्का ठरला आहे. गेल्या महिन्यात २० जून रोजी क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेला ६३ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी दिलेल्या ४२ लाखांच्या अनुदानप्रकरणी खर्चाचा परिपूर्ण अहवाल सादर करण्यासाठी नोटीस बजावली होती. आता भारतीय कुस्ती महासंघाने कुस्ती परिषदेलाच बरखास्त केले.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in