मुंबई : गैरव्यवहार, कर्ज वसुली करण्यात अडचणींचा डोंगर यामुळे जिल्हा बँकेच्या अडचणीत वाढ होत आहे, अशी माहिती सहकार मंत्र्यांनी विधान परिषदेत दिली. जिल्हा बँका मजबुतीने सुरू राहिल्या पाहिजेत. बँक बुडाल्या तर शेतकऱ्यांना पीक कर्ज देता येणार नाही. पीक कर्ज मिळत नाही, म्हणून शेतकरी खासगी सावकारांकडे जातात व कर्जबाजारी होतात, असेही महसूल मंत्री म्हणाले.
सांगलीतील जिल्हा मध्यवर्ती बँकेतील अधिकाऱ्यांनी अधिकाराचा गैरवापर करून संचालकांनी मोठ्या प्रमाणात मनमानी सुरू केली आहे. या आधी चौकशीचे आदेश दिले तेव्हा जवळपास २२ प्रकरणांत अनियमितता झाल्याचे समोर आले आहे. बँकेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
तेव्हा या प्रकरणाची आणि बँकेतील नोकरभरतीची सखोल चौकशी करून संचालकांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी गोपीचंद पडळकर यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून केली. यावरील चर्चेत प्रवीण दटके, अमोल मिटकरी यांनी सहभाग घेतला.
बँकेच्या कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची ८३ अन्वये चौकशी केली आहे. या प्रकरणी १५ कर्मचाऱ्यांना निलंबित केले असून, २ कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. या संदर्भात नेमलेल्या समितीचा अहवाल आला आहे. त्यामध्ये काही चुका व अनियमितता असल्यास नक्कीच कारवाई केली जाईल, असा इशारा महसूल मंत्र्यांनी दिला.