पालखी मार्गातील दिवेघाटाची दुरवस्था; पावसामुळे रस्त्यात चिखलाचे साम्राज्य

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याला अवघे काही दिवस शिल्लक असतानाच पालखी मार्गावरील महत्त्वाचा टप्पा असलेल्या दिवेघाटाची रस्ता रुंदीकरण आणि पावसाने मोठी दुरवस्था झाली आहे. शुक्रवारचा ढगफुटीसदृश पाऊस, त्यातून जमा झालेले दगड, चिखल अन् राडारोडा यामुळे घाटातून मार्ग काढणे कठीण झाले आहे.
पालखी मार्गातील दिवेघाटाची दुरवस्था; पावसामुळे रस्त्यात चिखलाचे साम्राज्य
Published on

पुणे : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याला अवघे काही दिवस शिल्लक असतानाच पालखी मार्गावरील महत्त्वाचा टप्पा असलेल्या दिवेघाटाची रस्ता रुंदीकरण आणि पावसाने मोठी दुरवस्था झाली आहे. शुक्रवारचा ढगफुटीसदृश पाऊस, त्यातून जमा झालेले दगड, चिखल अन् राडारोडा यामुळे घाटातून मार्ग काढणे कठीण झाले आहे. या मार्गावरून येत्या आठ दिवसांत लाखो वारकरी प्रवास करणार असल्याने प्रशासनासमोर वाट सुकर करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

हडपसरवरून पुरंदर तालुक्यात प्रवेश होताना वडकी नाल्याच्या पुढे दिवेघाट आहे. शुक्रवारी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे दिवेघाटातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर राडारोडा जमा झाला आहे. सध्या या घाटात रुंदीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. घाट मोठया प्रमाणात फोडण्यात तसेच खणण्यात आल्याने पावसाचे पाणी दगड-मातीसह रस्त्यावर येत असल्याचे दृश्य पहायला मिळाले. संत ज्ञानेश्वर महाराज राष्ट्रीय पालखी मार्गाचे काम सध्या हाती घेण्यात आले आहे. परंतु, दिवे घाटातील एकूणच परिस्थितीमुळे वारकऱ्यांच्या सुरक्षेच्या प्रश्न निर्माण झाला आहे.

अजितदादांची तातडीची बैठक

संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी देहूहून पंढरपूरकडे प्रस्थान करताना हडपसरमार्गे पुरंदर तालुक्यातून दिवेघाटातून प्रवेश करते. यंदा २२ जून रोजी पालखी सोहळा दिवेघाटातून पुरंदर तालुक्यात आगमन करत आहे. यंदाही लाखो वारकरी याच मार्गावरून पायी प्रवास करणार असल्याने रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करणे आवश्यक बनले आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शनिवारी तातडीची बैठक घेतली. पालख्या पुण्यात येण्यापूर्वी दिवेघाटातील हा राडारोडा तातडीने काढून रस्ता सुस्थितीत आणण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. प्रशासनानेही युद्धपातळीवर काम सुरू केले असून, लवकरात लवकर काम पूर्ण करण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in