

अलिबाग/पुणे : पुणे जिल्ह्यातील आळंदी येथील विनर्स अकॅडमी फॉर ११वी अँड १२वीच्या आठ विद्यार्थ्यांचा दिवेआगर समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना गुरुवारी सायंकाळी घडली. समुद्रातील पाण्याची खोली, प्रवाह आणि लाटांचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेने दिवेआगरसह संपूर्ण श्रीवर्धन तालुक्यात तसेच आळंदी येथील शैक्षणिक वर्तुळात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विनर्स अकॅडमीतील २५ मुले, १७ मुली आणि ६ शिक्षक असे एकूण ४८ जणांचे पथक पर्यटनासाठी दिवेआगर येथे आले होते. समुद्रकिनारी पर्यटनाचा आनंद घेत असताना काही विद्यार्थी समुद्राच्या पाण्यात पोहण्यासाठी उतरले. यावेळी पाण्याचा प्रवाह आणि खोलीचा अंदाज न आल्याने आठ विद्यार्थी समुद्रात बुडाले.
रायगड जिल्ह्यात पर्यटन हंगाम सुरू होत असतानाच ही मोठी दुर्घटना घडल्याने पर्यटन सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सध्या वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी बंद असल्याने किनाऱ्यावर नियमित असणारा प्रशिक्षित कर्मचाऱ्यांचा वावर कमी होता. यापूर्वीही रायगडच्या समुद्रकिनाऱ्यावर अशा दुर्घटना घडल्या असून, पर्यटकांनी समुद्रात उतरताना पाण्याचा व भरतीचा अंदाज घेणे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे अत्यंत गरजेचे असल्याचे या घटनेनंतर अधोरेखित होत आहे.
सुनेत्रा पवारांचा जिल्हाधिकाऱ्यांना फोन
या घटनेची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी रायगड जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे संवाद साधून घटनेची सविस्तर माहिती घेतली. तसेच बचावकार्य, मदतकार्य आणि परिस्थितीवर प्रशासनामार्फत तातडीने लक्ष ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
स्थानिकांची तत्काळ मदत
घटनेची माहिती मिळताच दिवेआगर येथील भाऊ मारुती साळुंखे महाकाली वॉटर स्पोर्ट्सचे मालक भाऊ साळुंखे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तत्काळ समुद्रात शोधमोहीम सुरू केली. त्यांनी अथक प्रयत्न करत आठही विद्यार्थ्यांना पाण्यातून बाहेर काढले. मात्र, तोपर्यंत सर्व आठ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती मिळताच दिघी सागरी-बोर्ली पंचतन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष आवटी पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह ताब्यात घेतले असून, पुढील वैद्यकीय व कायदेशीर प्रक्रियेसाठी बोर्ली पंचतन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले आहेत. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील कार्यवाही सुरू आहे.
मृतांची नावे :
मृत विद्यार्थ्यांची नावे तन्मय दत्तात्रय वहीले, सुमित भरत अहिरे, प्रणव रामदास बनसोडे, कैवल्य सतीश वासनकर, राजवीर युवराज वहीले, यश किरण वानखेडे, सोहम तुकाराम भांडवलकर आणि कौस्तुभ संदीप दौंड अशी आहेत. सर्व मृत विद्यार्थी वय १६ वर्षे, रा. आळंदी, पुणे येथील असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. एकाच अकॅडमीतील आठ विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, आळंदी परिसरातूनही हळहळ व्यक्त होत आहे. सर्व मृतदेह बोर्ली पंचतन प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले आहेत. पोलीस आणि प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरू आहे.