विभागीय नाट्यसंमेलन आजपासून महाबळेश्वरमध्ये

या दिंडीमध्ये महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडविणारे विविध चित्ररथ सहभागी होणार आहेत.
विभागीय नाट्यसंमेलन आजपासून महाबळेश्वरमध्ये

कराड : महाराष्ट्राचे नंदनवन महाबळेश्वर येथे आज २३ ते २५ फेब्रुवारी दरम्यान होत असलेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या शंभराव्या विभागीय नाट्यसंमेलनाची लगबग सुरु झाली आहे. येथील पोलीस परेड मैदानावर मुख्य रंगमंच उभारण्याचे काम देखील सुरु झाले आहे. त्याचप्रमाणे या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये स्थानिक नाट्यकर्मी कलावंत रंगीत तालमीच्या तयारीमध्ये गुंतले आहेत. यानिमित्ताने संपूर्ण शहर सुशोभित करण्यात येणार असून महाबळेश्वरकर संमेलनासाठी येणाऱ्या नाट्यकर्मींच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत.

या संमेलनाची संपूर्ण तयारी पूर्ण झाली असून यासाठी नाट्य परिषदेच्या महाबळेश्वर शाखेचे अध्यक्ष डी.एम.बावळेकर, महाबळेश्वर पालिकेचे मुख्याधिकारी व प्रशासक योगेश पाटील, नियामक मंडळ सदस्य राजेश कुंभारदरे, कोषाध्यक्ष सतीश लोटके, उपाध्यक्ष संतोष शिंदे, बबनराव ढेबे, संजय दस्तुरे, विलास काळे आदी मान्यवर परिश्रम घेत आहेत.

महाबळेश्वर येथील नाट्य चळवळीस गती मिळावी या उद्देशाने हे संमेलन येथे आयोजित करण्यात आले असून या संमेलनामुळे येथील नाट्य कर्मींना नवी ऊर्जा मिळणार आहे व भविष्यात महाबळेश्वरमधील कलाकार महाराष्ट्रभर चमकतील असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.यासाठी संमेलनाच्या पूर्वसंध्येस स्थानिक कलाकारांच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते तर २३ फेब्रुवारी रोजी दुपारी ३.३० ते ४.३० या वेळेत एकांकिका, नाट्य छटा व नाट्य संगीत व ४.३० ते ६.३० या वेळेत स्थानिक कलाकलारांचे ''गाढवाचं लग्न'' त्यानंतर ६.३० ते ७.३० "नाना जरा थांबा ना" ही विनोदी एकांकिका सादर केली जाणार आहे तर, आठ वाजता ''डोन्ट वरी हो जायेगा'' हे दिग्गज कलाकारांचे व्यावसायिक नाटक सादर केले जाणार आहे.

शनिवार २४ फेब्रुवारी सकाळी शहरातून दहा वाजता भव्य नाट्य दिंडीचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये सिने व नाट्य कलाकारांची विशेष उपस्थिती असणार आहे. या दिंडीमध्ये महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडविणारे विविध चित्ररथ सहभागी होणार आहेत. या दिंडीचे मुख्य वैशिष्ट विविध राज्याचे वेशभूषा परिधान करून त्या राज्याचे नृत्य स्थानिक महिला सादर करणार आहेत. त्याचप्रमाणे महाबळेश्वर तालुका वारकरी संघटना या दिंडीमध्ये पारंपरिक वेशात सहभागी होणार आहेत. या दिंडीची सुरुवात वेण्णा दर्शन येथून होणार असून हि दिंडी बाजार पेठ मार्गे पोलीस परेड मैदानावर उभारण्यात आलेल्या छ. शिवाजी महाराज नाट्य नगरी येथे या दिंडीचा समारोप होईल. दिंडी पोहोचल्यानंतर या नाट्य संमेलनाचे उद्घाटन दुपारी दोन वाजता महाबळेश्वर तालुक्याचे सुपुत्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते तर, परिषदेचे विश्वस्त, संमेलनाचे मुख्य निमंत्रक उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री शंभूराज देसाई, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष अभिनेते प्रशांत दामले, संमेलनाध्यक्ष डॉ.जब्बार पटेल, ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, आ. मकरंद पाटील यांच्यासह मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. उद्घाटन सोहळ्यानंतर हास्यसम्राट प्रा. अजितकुमार कोष्टी यांचा हसवणुकीचा कार्यक्रम होईल.

सायंकाळी ५.३० वाजता "कुर्रर्रर्रर्रर्रर्र" हे व्यावसायिक नाटक सादर केले जाणार आहे. या नाटकामध्ये प्रसिद्ध हास्य कलावंत पंढरीनाथ कांबळे उर्फ पॅडी विशाखा सुभेदार, प्रियदर्शन जाधव आदी प्रसिद्ध कलाकार सहभागी होणार आहेत. रात्री आठ वाजता नाट्य व सिनेकलावंतांनी सादर केलेल्या संगीत रजनी हा कार्यक्रम होणार आहे.

रविवार २५ फेब्रुवारी रोजी देखील भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये सकाळी १०.३० वाजता स्थानिक महिला व नाट्यकर्मी यांचा सांस्कृतिक कार्यक्रम ११ ते ४ खास लहान मुलांसाठी तीन बाल नाट्यांचा धमाका उडणार आहे. या तीन बालनाट्यातील पहिले पुष्प महाबळेश्वर गिरीस्थान शिक्षण मंडळांच्या वतीने स्थानिक शालेय विद्यार्थीशिवराज्याभिषेक सोहळा हे बालनाट्य सादर करणार आहेत. दुपारी १२ ते २ वाजता फुग्यातला राक्षस व टेड्डी आणि डोरेमॉन हे दोन व्यावसायिक बालनाट्य सादर केली जाणार आहेत. अश्या पद्धतीने या संमेलनामध्ये बालचमूंना बालनाट्याच्या माध्यमातून आगळीवेगळी पर्वणीच मिळणार आहे. दुपारी ३ ते ४ वाजता नाटक माझ्या चष्म्यातून या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले असून या परिसंवादामध्ये साताऱ्याचे खा. श्रीनिवास पाटील, डॉ. भावेश भाटिया आदी सहभागी होणार आहेत. या परिसंवादाचे संचालन प्रसिद्ध सिने नाट्य अभिनेते हृषीकेश जोशी करणार आहेत. चार वाजता संमेलनाचा हस्तांतरण सोहळा आयोजित करण्यात आला असून या सोहळ्यासाठी डॉ. जब्बार पटेल, सौ. नीलम शिर्के - सामंत व खा. श्रीनिवास पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. ५ ते ७.३० या वेळेत सिने व नाट्य कलावंत महाराष्ट्राची लोकधारा हा रंगारंग कार्यक्रम होणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in