मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरे-तांबे गावी दिवाळी साजरी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरे-तांबे गावी दिवाळी साजरी

एकनाथ शिंदे यांच्या रूपाने सातारा जिल्ह्याला लाभलेले हे चौथे मुख्यमंत्रीपद आहे.

राज्याच्या विसाव्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांनी गुरूवारी सायंकाळी शपथ घेतली. शिंदे मुख्यमंत्री झाल्याचे समजताच सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील दरे-तांबे या त्यांच्या मूळ गावी दिवाळी साजरी झाली. दुर्गम अशा कोयना जलाशयाच्या काठावर वसलेल्या या छोट्या गावातील गावकऱ्यांनी एकच जल्लोष केला. एकनाथ शिंदे यांच्या रूपाने सातारा जिल्ह्याला लाभलेले हे चौथे मुख्यमंत्रीपद आहे.

नाट्यमय घडामोडीत भाजपने शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ घातली आहे. याचा आनंद शिंदे गटासह भाजपलाही जसा झाला, यापेक्षा अधिक आनंद एकनाथ शिंदे यांचे मूळ गाव असलेल्या सातारा जिल्ह्यातील दरे-तांबे गावातील गावकऱ्यांना व सातारा जिल्हावासियांना झाला आहे. आपल्या गावचे सुपूत्र मुख्यमंत्री झाल्याने दरेकरांना तर आपल्या जिल्ह्याला पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची आयती संधी चालून आल्याने सातारा जिल्हा वासियांना याचा वेगळा अभिमान आहे. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर पहिले मुख्यमंत्री म्हणून स्व. यशवंतराव चव्हाण यांना मान मिळाला होता. त्यानंतर काँग्रेस नेतृत्वाने सन १९८२-८३ च्या दरम्यान जिल्ह्यातील कलेढोण येथील बॅ.बाबासाहेब भोसले यांना तर सन २०१० साली कराडचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळण्याची जबाबदारी दिली होती. आता सुमारे आठ वर्षांच्या कालावधीनंतर पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्या रूपाने सातारा जिल्ह्याला चौथ्यांदा मुख्यमंत्री पदाचा मान मिळाला आहे.

डोंगर, दऱ्यांतील जावळी तालुक्यातील दरे तांबे गावचे मूळचे असलेले एकनाथ शिंदे यांनी वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी आपल्या व कुटुंबियांच्या उदरनिर्वाहासाठी गाव सोडून मुंबई गाठली. मुंबईजवळील ठाणे ही आपली कर्मभूमी मानून तेथे त्यांनी रिक्षा व्यावसायापासून आपल्या कारकिर्दीची सुरूवात केली.

याचवेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तेजस्वी विचारांनी आणि ओजस्वी वाणीने भारावलेल्या तरूणाईचा तो काळ होता. मुंबईसह ठाणे जिल्हा बाळासाहेबांच्या विचारांना वाहून घेणारा भाग होता.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in