

पुणे : डीजे डान्स आणि डीजे लावणीच्या नावाखाली महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीची विटंबना करणारे अशोभनीय कार्यक्रम तातडीने बंद करण्यात यावेत, अशी मागणी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले आणि अभिनेत्री व सामाजिक कार्यकर्त्या टीना शर्मा-घेवारे मंगळवारी यांनी पत्रकार परिषदेत केली.
चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, अभिनेत्री टीना शर्मा घेवारे यांच्यासह सर्वात्मक महारुद्र ट्रस्ट व राष्ट्रीय महाकाल सेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रकाश भाऊ शिंदे, मनसे पुणे शहर सचिव सोनाली पोकळे, दिशा फाऊंडेशनच्या अर्चना चंदनशिवे तसेच मराठी रंगभूमी निर्माता महासंघ व बालगंधर्व परिवार ट्रस्टचे अनेक पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. लावणीच्या नावाखाली सध्या सुरू असलेला अश्लिलतेचा बाजार थांबवण्यासाठी शासनाने थेट आदेश द्यावेत आणि 'कला हवी, अश्लीलता नको' ही भूमिका कठोरपणे राबवावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
अल्पवयीन मुलांचाही सहभाग
सध्या डीजे लावणी आणि डान्सच्या नावाखाली आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमांमध्ये अत्यंत अशोभनीय अंगविक्षेप करणे, पैशांची उधळण करणे आणि प्रेक्षकांना थेट स्टेजवर बोलावून सादरीकरण करणे अशा गोष्टी घडत आहेत. यामुळे महिला कलाकारांना अत्यंत लज्जास्पद वाटेल अशा पद्धतीचे वातावरण तिथे निर्माण होत आहे. या सगळ्यात अत्यंत चिंतेची बाब म्हणजे, अशा अश्लील कार्यक्रमांमध्ये अल्पवयीन मुलांनादेखील सहभागी करून घेतले जात आहे, जो एक अत्यंत गंभीर सामाजिक प्रश्न बनला आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे केवळ साधे मनोरंजन म्हणून न पाहता, महिला व बालसुरक्षा तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणून याकडे गांभीर्याने पाहावे व अशा कार्यक्रमांवर बंदी घालावी, अशी मागणी भोसले यांनी केली आहे.
अशोभनीय सादरीकरण
लावणी ही महाराष्ट्राची समृद्ध आणि अत्यंत अभिमानास्पद अशी लोककला आहे. मात्र, लावणीच्या गोंडस नावाखाली अश्लील नृत्य आणि अशोभनीय सादरीकरण करून या कलेची बदनामी करणाऱ्यांना समाज व कला क्षेत्रात थारा दिला जाऊ नये, अशी भूमिका त्यांनी मांडली. जे गुणवंत लावणी कलाकार आहेत, त्यांना योग्य व्यासपीठ, आदर व रोजगाराच्या नवीन संधी शासनाकडून मिळाल्या पाहिजेत, असेही त्या म्हणाल्या.
अश्लिलतेला कोणतेही स्थान मिळता कामा नये
कलेचा सन्मान राखणे ही कलाकारांची स्वतःची जबाबदारी आहे. लावणी हा केवळ डान्स नसून त्यामध्ये अभिनय, नृत्य, विविध भावभावना आणि महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचा एक अत्यंत सुंदर संगम असतो. अशा समृद्ध कलेला अश्लील हावभावांमुळे बदनाम करणे हे अत्यंत चुकीचे आहे. मूळ आणि गुणवंत कलाकारांना त्यांचा सन्मान मिळाला पाहिजे आणि या पवित्र क्षेत्रात अश्लिलतेला कोणत्याही प्रकारचे स्थान मिळता कामा नये, असे टीना शर्मा यांनी नमूद केले.