माऊलींच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान; अलंकापुरीत भक्तीच्या जलधारांचा वर्षाव

टाळ-मृदंगाचा नाद...ज्ञानोबा-तुकोबा नामाचा जयघोष...अन् पावसाचा अखंड वर्षाव...अशा वातावरणात पवित्र इंदायणी नदीच्या व लाखो वैष्णवांच्या साक्षीने संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीने गुरुवारी रात्री अलंकापुरीतून पंढरपूरकडे थाटात प्रस्थान ठेवले.
माऊलींच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान; अलंकापुरीत भक्तीच्या जलधारांचा वर्षाव
Published on

पुणे : टाळ-मृदंगाचा नाद...ज्ञानोबा-तुकोबा नामाचा जयघोष...अन् पावसाचा अखंड वर्षाव...अशा वातावरणात पवित्र इंदायणी नदीच्या व लाखो वैष्णवांच्या साक्षीने संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीने गुरुवारी रात्री अलंकापुरीतून पंढरपूरकडे थाटात प्रस्थान ठेवले.

प्रस्थान सोहळ्य़ाचा अमृतानुभव घेण्यासाठी वैष्णवांनी इंद्रायणीकाठी मोठी गर्दी केली होती. पावसाच्या सरी अंगावर झेलतच वारकऱ्यांनी प्रस्थान सोहळ्याची वाट धरली आणि या जलधारांच्या साक्षीनेच प्रस्थान सोहळा पार पडला. इंद्रायणी घाट, सिद्धबेट, हैबतबाबा पायरी, पुंडलिक मंदिर, नृसिंह सरस्वती महाराज मंदिर, संत जलाराम मंदिर, साईबाबा मंदिर, गजानन महाराज मंदिर, पद्मावती, गोपाळपुरा, विश्रांतवाड परिसर वारकऱ्यांनी दुमदुमून गेला. देवस्थानाचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, पालखी सोहळाप्रमुख डॉ. भावार्थ देखणे, विश्वस्त ॲड. राजेंद्र उमाप, चैतन्य लोंढे, ॲड. रोहिणी पवार, पुरुषोत्तम पाटील, पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर, देवस्थानचे व्यवस्थापक माऊली वीर यावेळी उपस्थित होते.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या १९४ व्या आषाढी पायीवारी प्रस्थान सोहळ्य़ास पहाटे चारला घंटानादाने सुरुवात झाली. काकडा, अभिषेक, महापूजा, पंचामृतपूजा, दुधारती करण्यात आली. दुपारी वीणामंडपात कीर्तन झाले. साडेतीन वाजेपर्यंत दर्शनबारी सुरु होती. सायंकाळी पाच ते सात दरम्यान माऊलींची नित्य गुरुवारची पालखी मिरवणूक झाली. प्रस्थान सोहळ्य़ातील मानाच्या ४७ दिंड्यांना मंदिरात प्रवेश देण्यात आला. सर्व दिंड्या मंदिराला प्रदक्षिणा घालून पुढे पुढे सरकत होत्या. वीणा-टाळ-मृदंगाच्या गजराने माऊली, तुकारामांच्या जयघोषाने मंदिर व आजूबाजूचा परिसर भक्तिमय झाला होता.

रात्री सातनंतर पालखी प्रस्थानाच्या मुख्य सोहळ्य़ाला सुरुवात झाली. श्रीगुरू हैबतबाबा यांच्यातर्फे श्रींची आरती झाली. त्यानंतर माऊली संस्थानातर्फे श्रींची आरती झाली. वैभवी चांदीच्या पादुका प्रस्थानासाठी पुष्पसजावटीने सजलेल्या चौथऱ्यावर वीणा मंडपात ठेवण्यात आल्या. चलपादुकांची विधिवत प्राणप्रतिष्ठा झाली. सर्वांच्या मुखी ‘ज्ञानोबा, तुकाराम', ‘माऊली माऊली', ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम' असा गजर सुरू होता. उत्तरोत्तर सोहळ्य़ाची रंगत वाढतच गेली. सोहळा सुरू असताना दिंड्यांमधील भगवे ध्वज डौलाने फडकत होते. त्यानंतर माऊलींचे मानाचे दोन अश्व मंदिरात आणण्यात आले. अश्वांनी मंदिराला प्रदक्षिणा घातली. अश्व महाद्वारातून बाहेर पडताच मंदिरातील दिंड्या मंदिराबाहेर सोडण्यास सुरुवात करण्यात आली. पालखी मंदिरातून बाहेर निघताच उपस्थित वारकरी, भक्तांनी एकच जल्लोष सुरू केला. पालखी खांद्यावर घेण्यासाठी वारकरी, भाविकांची झुंबड उडाली होती. या उत्साही वातावरणातच पालखीची मंदिराला प्रदक्षिणा झाली आणि पालखी मुक्कामासाठी आजोळी गांधीवाड्यात दाखल झाली. शुक्रवारी सकाळी पालखी सोहळा पुण्याकडे मार्गस्थ होणार आहे.

वारकऱ्यांच्या आनंदाला उधाण

पहाटेपासून पवित्र इंद्रायणी नदीला पूर आला होता. दिवसभर पावसाच्या सरी पडत होत्या. या आल्हाददायक वातावरणात राज्यभरातून आलेल्या वैष्णवांनी दुथडी भरून वाहणाऱ्या इंद्रायणीत तीर्थस्नान केले. इंद्रायणीचे दोन्ही काठ ज्ञानोबा, तुकारामांच्या नामघोषात मंत्रमुग्ध झाले होते. यादरम्यान, सोहळ्य़ात सहभागी झालेले दोन वारकरी इंद्रायणीच्या पाण्यात वाहून गेले. मात्र, ‘एनडीएआरएफ’च्या पथकाने त्यांना वाचवले.

तरुणाईचा उत्साह

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरात येणाऱ्या दिंड्यांमध्ये तरुण-तरुणींचा मोठा सहभाग होता. यामध्ये ग्रामीण भागातील तरुण-तरुणींबरोबरच शहरी भागातील तरुण वर्गाचा सहभागही होता. गळ्य़ात टाळ घेऊन तसेच डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन हे तरुण दिंडीमध्ये सहभागी झाले होते.

logo
marathi.freepressjournal.in