भ्रष्टाचार करा, भाजपमध्ये या, हीच मोदी की गॅरंटी! उद्धव ठाकरे यांचा घणाघात: पेणमधून जनसंवाद यात्रेला सुरुवात

भ्रष्टाचार करा, भाजपमध्ये या, कुछ नहीं होगा, हीच मोदी गॅरंटी आहे, अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर केली
भ्रष्टाचार करा, भाजपमध्ये या, हीच मोदी की गॅरंटी! उद्धव ठाकरे यांचा घणाघात: पेणमधून जनसंवाद यात्रेला सुरुवात

वार्ताहर/पेण : भ्रष्टाचार करा, भाजपमध्ये या, कुछ नहीं होगा, हीच मोदी गॅरंटी आहे, अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी येथे केंद्र सरकारवर केली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जनसंवाद यात्रेची सुरुवात गुरुवारी पेण शहरातून झाली. यावेळी ठाकरे यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फुटीर आमदारांचा चांगलाच समाचार घेतला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अंतरिम बजेटला जादूचे प्रयोग म्हणत संभावना केली.

शिवसेनेतून चाळीस आमदार फुटून शिंदे गटात गेल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे रायगड दौऱ्यावर आले होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी ईडी, सीबीआयवरून भाजपवर निशाणा साधला. ठाकरे म्हणाले, ‘‘भ्रष्टाचार करा, भाजपमध्ये या, तुम्हाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीपद मिळेल. अब की बार ४०० पार, असे होणार असेल तर तुम्हाला नितीश कुमार का लागतात? एका बाजूला हेमंत सोरेन यांना अटक आणि दुसरीकडे अजित पवारांना क्लीनचिट, हीच का मोदी की गॅरंटी,’’ असे सवाल त्यांनी केले.

ठाकरे म्हणाले, ‘‘आरोप करणारे हेच, पक्षात घेणारे हेच आणि क्लीनचिट देणारेही हेच. नितीश कुमारांनी भाजपसोबत शपथ घेतली आणि दुसऱ्या दिवशी लालूप्रसाद यादव आणि तेजस्वी यादव यांना ईडीचे समन्स आले. ही मोदी गॅरंटी, ही गॅरंटी तुम्हाला परवडणार आहे का? जे हुकूमशाहीविरोधात राहतील, त्यांना तुरुंगात टाकले जातेय. भाजप-आरएसएसच्या कार्यकर्त्यांनी आता डोळे उघडावेत. ही लढाई भाजपविरोधात इतर पक्ष अशी नाही, तर ही लढाई हुकूमशाही विरुद्ध लोकशाही अशी आहे. तुम्ही ज्यांच्या सतरंज्या उचलताय, ज्यांच्यामागे उठाबशा काढताय, त्यांच्या हातात देश देताय, याचा अर्थ तुम्ही तुमच्या पुढच्या पिढ्या हुकूमशाहीच्या हातात देताय. पुढच्या पिढ्या तुम्हाला माफ करणार नाहीत,’’ असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.

‘‘एखाद्याला गाडायचे तर आधी खड्डा करावा लागेल. त्या खड्ड्यात मतांची माती टाकावी लागेल. त्यासाठी आपल्याला गावागावात, घराघरात जावे लागेल. प्रत्येक ठिकाणी जाऊन गेल्या १० वर्षांतील सरकारच्या कामांचा आढावा घ्या. जे अर्थसंकल्प मांडले, ते त्यात प्रत्यक्षात किती उतरलंय? महिलांना योजनांचा लाभ मिळाला का? शेतकऱ्यांना मदत मिळाली का? तरुणांना नोकरी मिळाली का? हे प्रश्न विचारा. कोकणात २ वेळा चक्रीवादळ येऊन गेले, तेव्हा केंद्राकडून एकही मदत आली नाही. संकट आल्यावर पंतप्रधान कोकणाकडे फिरकले नाहीत. गुजरात दौरे मात्र वेळोवेळी सुरू होते. मी मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांना मदत केली. आता पंतप्रधान महाराष्ट्रामध्ये सारखे दौरे करत आहेत. मते हवी असताना मेरे प्यारे देशवासियों आणि निवडून आल्यावर तुम्हाला चिरडून विकास करणे, हे त्यांचं काम आहे, अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी मोदींवर केली.

हुकूमशाही की देशभक्ती, तुम्हीच ठरवा!

‘‘मला अशी स्वप्नं पडत नाहीत. ना मुख्यमंत्रीपदाचे पडले होते, ना पंतप्रधानपदाचे स्वप्न पडते. मला फक्त दिसतोय माझा देश, माझी भारतमाता आणि या भारतमातेच्या बाजूला असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं संविधान. हे आम्हाला वाचवायचं आहे. कोणालाही मतदान करायचं म्हणून मत द्यायचे नाही. हे मत तुम्ही स्वत: तुमच्या पुढच्या पिढीसाठी देणार आहात. संपूर्ण देशाचा तुरुंग झाला तर त्या वातावरणात तुमच्या पिढीने जगावं, अशी तुमची इच्छा असेल तर जरूर तुम्ही हुकूमशाहीला मतदान करा. नाहीतर इंडिया आघाडी जी देशभक्तांची आघाडी आहे तिला तुम्ही मतदान करा, असे आवाहन ठाकरे यांनी केले.

logo
marathi.freepressjournal.in