बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील बेळगावबाबत वाद सुरू असतानाच कर्नाटकच्या एका आमदाराने आता थेट मुंबईला केंद्रशासित प्रदेश करण्याची मागणी केली आहे. कर्नाटकात विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात उत्तर कर्नाटकातील विकासाचा मुद्दा चर्चेत असताना अथणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण सवदी यांनी मुंबईला केंद्रशासित प्रदेश करण्याची मागणी केली.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र आणि कर्नाटकातील सीमावाद पेटला आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यक्रमाला कर्नाटक सरकारने परवानगी नाकारल्यानंतर सीमावाद अधिक चिघळला. तेव्हा महाराष्ट्रातील शिवसेना (उबाठा) आमदार आदित्य ठाकरेंसह अनेक आमदारांनी बेळगावला केंद्रशासित प्रदेश करण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली होती. यावरून अनेक आरोप-प्रत्यारोपही झाले होते. आता हाच मुद्दा थेट कर्नाटकच्या विधानसभेत मांडण्यात आला आहे.
आमदार लक्ष्मण सवदी म्हणाले, महाराष्ट्रातील बुद्धिभ्रष्ट झालेल्या एका नेत्याने बेळगावसह सीमाभाग केंद्रशासित करावा, असे वक्तव्य केले आहे. यासंदर्भात माध्यमांनी आम्हाला प्रश्न विचारले. त्यावेळी संबंधित नेत्यांची मती भ्रष्ट झाल्याचे मी स्पष्टपणे सांगितले होते. कर्नाटकचा अविभाज्य अंग असलेला बेळगाव सीमाभाग केंद्रशासित करायचा असेल तर मुंबईदेखील केंद्रशासित करावी, अशी आम्ही मागणी केली पाहिजे, असे सवदी म्हणाले.
मुंबईवर आमचाही अधिकार
आमचे पूर्वज मुंबईत वास्तव्यास होते. त्यामुळे आमचाही मुंबईवर अधिकार आहे, असे आम्ही म्हणू शकतो. कारण पूर्वी बेळगावसह अन्य सहा जिल्हे मुंबई प्रांताचा भाग असताना आमचे कर्नाटकातील लोक मुंबईला जात होते. त्याठिकाणी वास्तव्य करत होते. त्यामुळे आमचाही मुंबईवर हक्क आहे म्हणून प्रथम मुंबई केंद्रशासित केली जावी आणि तसा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवावा, असे लक्ष्मण सवदी म्हणाले. लक्ष्मण सवदी एवढेच बोलून शांत न बसता पुढे म्हणाले, महाराष्ट्राला बेळगाव हवे असेल तर त्यांना तो द्यावा आणि त्या बदल्यात आमच्या पूर्वजांनी राज्य केलेले मुंबई कर्नाटकात घ्यावे.
आदित्य ठाकरेंची टीका
मुंबई केंद्रशासित करण्याची मागणी निषेधार्ह आहे. काँग्रेस असो वा भाजप, कोणताही पक्ष असो, मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याची भाषा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अजिबात खपवून घेणार नाही. मुंबई ही आमची मायभूमी आहे. इथला प्रत्येक कण मराठी माणसाने आपले रक्त सांडून मिळवला आहे. मुंबई आम्हाला कोणी आंदण दिलेली नाही. काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी आपल्या आमदारांना समज द्यावी, असे आदित्य ठाकरेंनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले आहे.