नागपूर : ऑनलाईन गेमिंग अर्थात जुगाराच्या सततच्या जाहिरातीमुळे खेळण्याचा मोह होऊन त्याची सवय जडते. त्यामुळे ऑनलाईन गेमिंगच्या जाहिराती करणाऱ्या व्यक्तींनी अशा जाहिराती करू नये,असे आवाहन उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत एका लक्षवेधी सूचनेवरील चर्चेच्या उत्तरात केले. अशा जाहिरातींवर नियंत्रण आणणे शक्य आहे किंवा कसे हे तपासून पाहिले जाईल, असेही त्यांनी सांगितले.
भाजपचे आमदार आशीष शेलार यांनी गुरुवारी विधानसभेत महादेव अॅपच्या संदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. यावेळी झालेल्या चर्चेत सहभागी होताना अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी ऑनलाईन गेमिंगच्या जाहिरातींची तक्रार केली. चित्रपट सृष्टीतील तारेतारका , खेळाडू ऑनलाईन गेमिंगची जाहिराती करतात. त्याचा समाजावर दुष्परिणाम होत असल्याने या जाहिराती रोखण्यात याव्यात, अशी मागणी कडू यांनी केली. काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण यांनीही समाजातील प्रथितयश लोक टेलिव्हिजनवर जाहिराती करून जुगाराला प्रोत्साहन देत असल्याची तक्रार केली. या प्रश्नांना देताना फडणवीस यांनी ऑनलाईन गेमिंगची कार्यपद्धती सभागृहाला सांगितली.
प्रत्यक्षातील जुगार आता ऑनलाईनवर आला आहे. त्यासाठीचे अॅप दुबईहून नियंत्रित केले जातात. ऑनलाईन गेम खेळताना आयडी क्रमांक दिला जातो. त्यानंतर अनेकजण वेगवेगळ्या माध्यमातून चार बँकांमध्ये खाती काढतात आणि वेगवेगळे खेळाडू बनून ते खेळ खेळतात. त्यामुळे अशा खेळावर नियंत्रण आणण्यात अडचण नाही. मात्र, डार्कनेटवर सुरु असलेले गेम थांबवणे कठीण आहे. त्यामुळे यासंदर्भात कडक नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारला विनंती केली जाईल, असे फडणवीस यांनी सांगितले.
ऑनलाईन जुगार हा व्हाटसअॅप आणि टेलिग्रामच्या माध्यमातून चालतो. या जुगावरावर आपण नियंत्रण करू शकत नाही. मात्र, जेव्हा व्यक्तिंची संख्या वाढते तेव्हा याची व्याप्ती लक्षात येते. पोलिसांच्या सायबर विभागाला येथे प्रवेश मिळत नाही. त्यामुळे कंपन्यांना डेटा शेअरिंग करणे बंधनकारक केले पाहिजे यासाठी केंद्र सरकारला विनंती केली जाईल, असे फडणवीस यांनी सांगितले.
दरम्यान, महादेव अॅपकडून ६७ साईट चालवल्या जातात. या पोर्टलची नोंदणी दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएला येथे आहे. बँक खाते, पासवर्ड, ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन गेमिंग चालते, अशी माहिती फडणवीस यांनी दिली. महादेव ॲप आणि कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमशी संबंधित असलेल्या अमित शर्मा यांच्या कंपनीला पैसे पुरविणाऱ्या रशेश शहा आणि एडेलवाईज कंपनी तसेच त्यामध्ये झालेल्या व्यवहाराची येत्या दोन महिन्यात चौकशी करण्यात येईल, असे फडणवीस यांनी सांगितले. महादेव अॅपची ईडीमार्फत चौकशी सुरू आहे. या गुन्ह्याची व्याप्ती पाहून एसआयटी नेमण्यात आली आहे. बेटिंग अॅप कंपन्यांकडून त्यांना मिळालेल्या नफ्यातील रकमेवर जीएसटी न भरता सरकारी तिजोरीची नुकसान केल्याप्रकरणी चौकशी सुरू असल्याचे फडणवीस यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.