जालना : मराठा समाजातील संभाव्य उमेदवारांच्या नावांची यादी आपल्याकडे आहे. विधानसभेच्या निवडणुका लढविण्यास आम्हाला भाग पाडू नका, असा इशारा मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सोमवारी सरकारला दिला.
मराठा समाजातील नेत्यांची २९ ऑगस्ट रोजी बैठक होणार आहे आणि त्यामध्ये विधानसभेच्या २८८ जागा लढण्याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे. आपले समर्थक निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास इच्छुक नाहीत, परंतु सरकारने समाजाच्या मागण्या मान्य केल्या
नाहीत तर आम्हाला रिंगणात उतरणे भाग पडेल, असेही जरांगे यांनी रविवारी येथे वार्ताहरांना सांगितले.
... तर राणे यांना मराठा समाज माफ करणार नाही
माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्याबद्दल आपल्याला आदर आहे. समाजाला १६ टक्के आरक्षण मिळवून देण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. मात्र राणे आणि त्यांचा पुत्र नितेश यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आज्ञेनुसार कृती करू नये. राणे यांची वागणूक तशीच राहिल्यास मराठा समाज त्यांना कधीही माफ करणार नाही, असेही जरांगे म्हणाले.