सत्तेचा अन् खुर्चीचा गैरवापर करू नका ; जरांगे-पाटलांचा छगन भुजबळ यांना इशारा

सरकारच्या म्हणण्याप्रमाणे तीस दिवसांचा वेळ देत, दहा दिवस एक्स्ट्राही दिले आहेत. त्यामुळे आता निकष नको, असं देखील जरांगे पाटील म्हणाले.
सत्तेचा अन् खुर्चीचा गैरवापर करू नका ; जरांगे-पाटलांचा छगन भुजबळ यांना इशारा

सोलापूर : भुजबळसाहेब सत्तेचा आणि खुर्चीचा गैरवापर करू नका. परवा तुम्ही म्हणालात, माझं मराठा आरक्षणाबद्दल काहीही मत नाही. म्हणून मी गप्प बसलो. पण कार्यकर्त्याच्या माध्यमातून संभाजीनगरला सभा होऊ देणार नाही, असा डाव तुम्ही खेळत आहात. तुम्ही गप्प होता, म्हणून मी गप्प होतो. पण तुम्ही संविधानाने दिलेला अधिकार जर हिरावून घेत असाल तर मी गप्प बसणार नाही. मी शांत आहे. शांतच राहू द्या मला डिवचू नका, असा इशारा देत मनोज जरांगे-पाटील यांनी ओबीसी नेते आणि ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांच्यावर सोलापूरच्या सभेत तोफ डागली.

सकल मराठा समाजाच्या वतीने शहरातील हुतात्मा स्मृती मंदिर येथे मनोज जरांगे-पाटील यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी जरांगे-पाटील हे बोलत होते. १९९० च्या मंडल आयोगामध्ये मराठा समाजाला ओबीसीमधून का वगळण्यात आले. त्यावेळी काय निकष लावले होते. वगळताना विचार केला नाही, मग आता कसले पुरावे मागता? पुरावेच मागत असाल तर आत्तापर्यंत मी पाच हजार कुणबी दाखल्याचे पुरावे दिले आहेत. सरकारच्या म्हणण्याप्रमाणे तीस दिवसांचा वेळ देत, दहा दिवस एक्स्ट्राही दिले आहेत. त्यामुळे आता निकष नको, मराठ्यांना सरसकट ओबीसीमधून ५० टक्के आरक्षण द्या, अशी मागणी आरक्षण संघर्षयोद्धा मनोज जरांगे-पाटील यांनी केली आहे.

आरक्षणाच्या बाबतीत सरकार आजपर्यंत मराठा समाजाला खेळवत आली आहे. या समाजाच्या जीवावर यांनी राजकारण केले, मंत्रिपदे उपभोगली ते आरक्षणासाठी तोंड उघडत नाहीत. एक दिवस राज्यपालाच्या परवानगीने अधिवेशन घेऊन मराठा आरक्षणाविषयी निर्णय घेता येतो. महिनाभर मुदत मागण्याची गरज नाही. तरीही सरकार मुदतीवर मुदत मागत आहे. २००४च्या जीआरचा आधार घेतला तर निर्णय घेता येईल. कुणबी मराठा दाखल्याच्या प्रती पुरावा म्हणून दिल्या आहेत. सरकार आत्ता वंशावळीच्या नोंदी मागत आहे. आज तुम्ही सत्तेत आहात ते मराठा समाजाच्या मतांमुळेच. प्रत्येक वेळी समाजाने तुमच्यावर गुलाल टाकला. तुम्हाला खुर्च्या मिळवून दिल्या. आता समाजाच्या पदरात तुम्हीही काहीतरी टाका, अशी मागणीही जरांगे-पाटील यांनी यावेळी केली. सोलापूरच्या या सभेनंतर जरांगे-पाटील हे मंगळवेढ्याकडे रवाना झाले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला जरांगे-पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले, त्यानंतर सकल मराठा समाजाच्या वतीने माऊली पवार व राजन जाधव यांनी मनोज जरांगे-पाटील यांचा सत्कार केला. छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये सकल मराठा समाज व हरिदास चौगुले यांच्या वतीने जरांगे-पाटील यांचे पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले, तर छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीच्या वतीने पंधरा फूट उंचीचा हार क्रेनद्वारे घालून अमोल शिंदे, दिलीप कोल्हे, दास शेळके, इंद्रजीत पवार, रवी मोहिते, अनंत जाधव, विनायक महिंद्रकर, शेखर फंड, योगेश पवार व समितीच्या सदस्यांनी स्वागत केले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in