वरिष्ठांच्या भावनिक आवाहनाला बळी पडू नका! उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नागरिकांना आर्जव

तुम्ही ‘वरिष्ठां’च्या भावनिक आवाहनाला बळी पडू नका, असे शरद पवारांचे नाव न घेता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनतेला आर्जव केले.
वरिष्ठांच्या भावनिक आवाहनाला बळी पडू नका! उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नागरिकांना आर्जव

बारामती : मी आजपर्यंत तुमच्याकडे काहीही मागितले नाही. मी खासदारकीला उभ्या करणाऱ्या उमेदवारासाठी मते मागणार आहे. तुम्ही ‘वरिष्ठां’च्या भावनिक आवाहनाला बळी पडू नका, असे शरद पवारांचे नाव न घेता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनतेला आर्जव केले.

अजित पवार यांनी त्यांचाच बालेकिल्ला असलेल्या बारामतीत हा टोला लगावला. बारामतीत पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन केल्यानंतर उपस्थितांशी संवाद साधताना अजित पवार म्हणाले की, शेवटची निवडणूक आहे, असे सांगून तुम्हाला भावनिक आवाहन केले जाईल. पण, कधी शेवटची असणार आहे काय माहीत? असे सांगून त्यांनी शरद पवारांना टोला लगावला. इतकी वर्षे वरिष्ठांचे ऐकले, आता माझे ऐका. एकीकडे अजित सांगतो आहे आणि एकीकडे वरिष्ठ सांगताहेत. तुमच्यासमोर प्रश्न पडला असेल की, कुणाचे ऐकायचे. उद्या आपल्या विचाराचा खासदार दिला तर मी मोदींना सांगेन की माझ्या लोकांनी खासदार दिला आहे. आता माझी कामे झाली पाहिजेत. आपल्या अडचणीला कोण उपयोगी पडतो याचा विचार करा, असे भावनिक आवाहन अजित पवार यांनी केले.

ते म्हणाले की, काहींना उपाध्यक्ष, अध्यक्षांचे जोरात काम सुरू आहे. तिकडे गेलेले मला मुंबईत येऊन भेटले आणि माझी चूक झाली, असे सांगितले. आधी लोकसभा आणि नंतर विधानसभा निवडणूक असेल. अनेक धाडसाचे निर्णय सरकारने घेतले. लवकरच मी महायुतीचा उमेदवार जाहीर करणार आहे. त्या उमेदवाराला माझा उमेदवार म्हणून मतदान करा, असेही आवाहन त्यांनी केले.

कार्यकर्त्यांची कानउघाडणी

पवार यांनी यावेळी कार्यकर्त्यांची कानउघाडणी केली. अजूनही काहीजण कार्यकर्त्यांची जाणीवपूर्वक नावे घेत नाहीत, पण तुमच्या गटा-तटामुळे मला त्रास होतो. मी एकटा फिरेन, लोक द्यायची तेवढी मते देतील, असे म्हणत त्यांनी भाषणाच्या सुरुवातीला कानउघाडणी केली. कामे करताना मला वाईटपणा घ्यावा लागतो, सगळ्या महाराष्ट्राचा विकास झाला पाहिजे.

अजित पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे. रविवारी सकाळपासूनच त्यांनी बारामतीत अनेक कार्यक्रमांना हजेरी लावली.

logo
marathi.freepressjournal.in