विरोधी पक्षनेता पद नकोय! अजितदादांनी व्यक्त केली पक्ष संघटनेत काम करण्याची इच्छा

पक्ष कशा पद्धतीने चालतो हे मी दाखवून देईन, असे अजित पवार म्हणाले. अजितदादांच्या या नव्या पवित्र्यामुळे खळबळ उडाली
विरोधी पक्षनेता पद नकोय! अजितदादांनी व्यक्त केली पक्ष संघटनेत काम करण्याची इच्छा
Published on

विधानसभेचा विरोधी पक्षनेता होण्याची मला इच्छा नव्हती. मात्र, आमदारांनी सह्या केल्या आणि नेत्यांनी मला सांगितले म्हणून मी ते पद स्वीकारले. विरोधी पक्षनेते होऊन आता मला एक वर्ष झाले आहे. आता काही जण मला म्हणतात तू कडक वागत नाही. कडक वागत नाही म्हणजे मी काय आता गचांडी धरू का? असा सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद सोडण्याची इच्छा व्यक्त केली. या पदावरून मुक्त करण्याची विनंती करताना अजितदादांनी संघटनेची जबाबदारी देण्याची मागणी केली. पक्ष संघटनेत मला कोणतेही पद द्या, त्या पदाला न्याय देईन. पक्ष कशा पद्धतीने चालतो हे मी दाखवून देईन, असे अजित पवार म्हणाले. अजितदादांच्या या नव्या पवित्र्यामुळे खळबळ उडाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या २४ व्या वर्धापनदिना निमित्त बुधवारी षण्मुखानंद सभागृहात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात बोलताना अजित पवार यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या समक्ष पक्ष संघटनेतील पद देण्याची मागणी केली. शरद पवार यांनी अलीकडेच पक्षात राष्ट्रीय कार्याध्यक्ष हे नवीन पद तयार करून त्या जागी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची नियुक्ती केली आहे. सुळे यांच्याकडे महाराष्ट्राची जबाबदारी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे अजित पवार नाराज असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर अजितदादांनी पक्षसंघटनेची जबाबदारी मागितल्याची चर्चा रंगली आहे.

‘‘आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत समविचारी पक्षांना प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी आणि तेलंगणातील के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीची अडचण होऊ शकते,’’ असा इशारा देत अजित पवार म्हणाले, ‘‘या दोन पक्षांकडे आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला वंचितचा फटका बसला होता. आता चंद्रशेखर राव हे स्वतःच्या राज्यापेक्षा आपल्या राज्यात जास्त लक्ष घालत आहेत. ते राज्यातील नेते, माजी मंत्री, माजी आमदार यांना फोन करत आहेत. त्यामुळे निवडणुकीत समविचारी पक्षांच्या मतांची विभागणी झाली तर अडचण होऊ शकते,’’ असे अजित पवार म्हणाले.

‘‘आपण मुंबई, विदर्भात कमी पडतो. आजही मुंबईला पूर्णवेळ अध्यक्ष नाही. मुंबईचा अध्यक्ष नेमण्यासाठी आपल्याला दिल्लीला विचारायला जायचे आहे का? इथे आपल्याला महाराष्ट्रात बसूनच निर्णय घ्यायचा आहे. तरीही आपण कमी पडतो. त्यामुळे आजचा दिवस साजरा करताना आपण आत्मचिंतन, आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचा सल्ला अजित पवार यांनी दिला. त्याचवेळी संघटनेत वर्षांनुवर्षे एकाच पदावर काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना बदलण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.

स्वत:च्या बळावर सत्ता आणू शकलो नाही

अजित पवार यांनी पक्षातील पहिल्या फळीतील नेत्यांचे कान टोचले. ‘‘पक्ष सत्तेत आल्यानंतर तुम्हाला मंत्रिपद पाहिजे. मात्र, किती लोक स्वतःच्या जिल्ह्यात स्वतःसह इतरांना निवडून आणतात?’’ असा प्रश्न त्यांनी केला. ‘‘मंत्रिपद पाहिजे असेल तर पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणा, असे त्यांनी सुनावले. घोषणा देऊन, भाषण करून पक्ष मोठा होणार नाही. आपल्या पक्षाची स्थापना होऊन आज २४ वर्ष झाली पण ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल, के. चंद्रशेखर राव यांच्या प्रमाणे आपण महाराष्ट्रात एकट्याच्या ताकदीवर निवडून येऊ शकलेलो नाही. वरील नेत्यांपेक्षा आपले नेते शरद पवार उजवे असतानाही आपण आपली ताकद दाखवू शकलो नाही,’’ अशी खंत पवार यांनी व्यक्त केली.

logo
marathi.freepressjournal.in