डॉक्टर गुरु-शिष्यांची डिजिटल वारीची भन्नाट संकल्पना, कॅलिग्राफीच्या माध्यमातून वारी सोहळ्याचे दर्शन

वारकऱ्यांच्या मनातील भाव ओळखत डिजिटल वारी ही संकल्पना रुजवली. संतांनी रचलेले अभंग आणि त्यांचे अर्थ कॅलिग्राफी या सुलेखन पद्धतीने रेखाटत सोशल मीडियावर पोस्ट
डॉक्टर गुरु-शिष्यांची डिजिटल वारीची भन्नाट संकल्पना, कॅलिग्राफीच्या माध्यमातून वारी सोहळ्याचे दर्शन

आज आषाढी एकादशी. पंढरीची वारी (आषाढी वारी) ही महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचा एक अविभाज्य घटक आहे. ही पंढरपूरची वारी हा वारकरी संप्रदायाचा एक भक्कम असा आधार असला तरी या वारकऱ्यांसोबत विविध माध्यमातून प्रत्येक जण विठ्ठल रखुमाई प्रति आपले प्रेम दर्शवत असतो. पेशाने डॉक्टर असणाऱ्या डॉ. नरेंद्र कदम आणि डॉ. तेजस लोखंडे यांनी मात्र वारीचा अनुभव प्रत्यक्ष घेऊ न शकणाऱ्या लाखो भाविकांना आपल्या सुलेखनातून, कलेच्या माध्यमातून संपूर्ण वारी सोहळ्याचे दर्शन घडवण्याचा अनोखा प्रयत्न केला आहे.

पावसाळा आला की मुखी पांडुरंगाचे नाव आणि अभंगांच्या तालावर मग्न होत ठेका धरणारे वारकरी वारीत पाहायला मिळतात. वर्षभर आषाढी एकादशीची वाट पाहणाऱ्या लाखो वारकऱ्यांचा मात्र कोरोनाकाळात हिरमोड झाला.

कोरोनामुळे शतकानुशतके चालत आलेल्या वारी परंपरेत सलग दोन वर्षे खंड पडला. याकाळात डॉ. नरेंद्र कदम आणि डॉ. तेजस लोखंडे यांनी वारकऱ्यांच्या मनातील भाव ओळखत डिजिटल वारी ही संकल्पना रुजवली. संतांनी रचलेले अभंग आणि त्यांचे अर्थ कॅलिग्राफी या सुलेखन पद्धतीने रेखाटत सोशल मीडियावर पोस्ट करण्यात येऊ लागले.

''वारी जनांच्या मनातली'' या संकल्पनेतून कोरोनाकाळात तब्ब्ल दोन वर्षे सलग डिजिटल वारीच्या माध्यमातून प्रत्यक्ष वारीचा आणि तेथील भक्तिमय वातावरणाचा अनुभव, तसेच पांडुरंग-रखुमाई यांच्या रूपाचे वर्णन करणारे संतांनी रचलेले अभंग फेसबुक, व्हॉटसअँपद्वारे भक्तांपर्यंत पोहचवण्याचे काम ''डिजिटल वारी''च्या माध्यमातून करण्यात आले. गेली २४ वर्षे वैष्णव चॅरिट्रेबल व मेडिकल ट्रस्टतर्फे दिंडी मार्गावर वैद्यकीय शिबीरे या डॉक्टर गुरु शिष्य आणि त्यांच्या सहकार्यांकडून घेतले जाते.

डिजिटल वारीची संकल्पना नेमकी कशी?

प्रत्येकाने एकदा तरी ही वारी अनुभवायला हवी, असं म्हटलं जातं. कोरोनाचा दोन वर्षांत वारीला जाणे न झाल्याने लाखो भक्तांच्या मनाला चुटपुट लागून राहिली होती. त्याचवेळी डिजिटल वारी संकल्पनेचा जन्म झाला. गेल्या २४ वर्षात डॉ. नरेंद्र कदम आणि दाओ. तेजस लोखंडे या गुरु शिष्यांच्या जोडीने अनुभवलेली, प्रत्यक्ष पाहिलेली वारी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न डिजिटल वारीतून करण्याचा विचार मनात आणत ते प्रत्यक्षात अंमलात आणण्यात आले. वारी म्हणजे काय? वारकरी म्हणजे काय? दिंडी म्हणजे काय? दिंडी कुठून कशी मार्गस्थ होते? देवाचा घोडा म्हणजे काय? दिंड्यांपुढे रथाला असणारी बैलजोडी कोणाची असते? वारकऱ्यांचे दिंड्यांत चालताना नियम काय? वारीचे व्यवस्थापन? असे एक ना अनेक पडलेले प्रश्न आणि त्यांची उत्तरे या डिजिटल वारीद्वारे देण्याचा प्रयत्न करण्यात आला. एकूण वारी आणि वारी विषयक सर्व विषय संकलन ''वारी जनांच्या मनातली'' द्वारे सर्वत्र सुलेखन करत सांगण्यात येऊ लागले. अभंग, निरुपण अन् कॅलिग्राफी यांचा संगम भक्तांच्या देखील पचनी पडत या डिजिटल वारीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले.

यंदा आमचीही प्रत्यक्ष वारी घडली. ३ दिवस आम्ही स्वतः वैद्यकीय शिबिरात सहभागी होतो. कोरोनानंतर सगळ्यांच्या अंगात वेगळा उत्साह संचारला आहे. आमच्या अंगात डिजिटल वारी भिनल्यामुळे हा प्रवास दिंडी सोहळ्पाच्या प्रस्थानापासून आषाढी एकादशीपर्यंत लोकाग्रहास्तव आम्ही सुरु ठेवला असून ही परंपरा पुढेही चालू ठेवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत.

- डॉ. तेजस लोखंडे

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in