डॉक्टरांच्या संपाचा रुग्णालयांना फटका; वरिष्ठ डॉक्टरही सहभागी

कोलकातातील आर.जी.कर. वैद्यकीय महाविद्यालयात निवासी डॉक्टरवर बलात्कार करून हत्या केल्याच्या घटनेचे पडसाद मुंबईत उमटले. मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयातील परिचारिका आणि निवासी डॉक्टरांनी शुक्रवारी आंदोलन करत या घटनेचा निषेध केला.
डॉक्टरांच्या संपाचा रुग्णालयांना फटका; वरिष्ठ डॉक्टरही सहभागी
(छाया - विजय गोहिल)
Published on

मुंबई : कोलकातातील आर.जी.कर. वैद्यकीय महाविद्यालयात निवासी डॉक्टरवर बलात्कार करून हत्या केल्याच्या घटनेचे पडसाद मुंबईत उमटले. मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयातील परिचारिका आणि निवासी डॉक्टरांनी शुक्रवारी आंदोलन करत या घटनेचा निषेध केला.

निवासी डॉक्टरांच्या देशव्यापी संपात मुंबईतील सरकारी आणि पालिका रुग्णालयांतील वरिष्ठ निवासी डॉक्टरही शुक्रवारी सहभागी झाल्याने रुग्णसेवेला मोठा फटका बसला. याची दखल घेत पालिका मुख्यालयात उच्चस्तरीय बैठकही झाली.

कोलकाता येथील निवासी महिला डॉक्टरवर बलात्कार केल्यानंतर तिची हत्या झाल्याचे प्रकरण उघडकीस येताच डॉक्टरांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. मुंबईतील निवासी डॉक्टर देशव्यापी संपात सहभागी झाले आहेत. वरिष्ठ निवासी डॉक्टरही शुक्रवारी या संपात सहभागी झाले.

सेंट्रल मार्डचे महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. प्रतीक देबजे यांनी सांगितले की, शुक्रवारी सहा हजार ते सात हजार वरिष्ठ निवासी डॉक्टर संपात उतरले. सुमारे १७ हजार ते १८ हजार निवासी डॉक्टर आधीपासूनचे संपावर आहेत.

दरम्यान, मार्डने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत शुक्रवारी केईएम रुग्णालयात ४८, नायर रुग्णालयात तीन, कूपर रुग्णालयात चार इतक्याच मोठ्या शस्त्रक्रिया झाल्या. सायन, नायर दंत महाविद्यालय येथे ही संख्या शून्य होती. लहान शस्त्रक्रिया केईएममध्ये १४, कूपरमध्ये दोन, तर नायर दंत महाविद्यालयात चार इतक्याच होऊ शकल्या. ही आकडेवारी दुपारी तीन वाजेपर्यंतची आहे. गर्भवतींच्या प्रसुतीचा विचार केला तर, केईएममध्ये सात, सायन रुग्णालयात दहा, नायर रुग्णालयात चार आणि कूपरमध्ये एक अशी आकडेवारी समोर आली.

वरिष्ठ पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले की, हा संप देशस्तरावर सुरू आहे. त्यामुळे यात पालिका प्रशासनाच्या भूमिकेला मर्यादा आहेत. असे असले तरी रुग्णसेवेवर विपरित परिणाम होऊ नये, यासंबंधी उपाययोजनांचा आढावा घेत आहोत.

संपामुळे रुग्णांची लवकर सुट्टी...

मेंदूतील रक्तस्रावामुळे केईएम रुग्णालयात दाखल केलेल्या एका महिला रुग्णाला शुक्रवारी सकाळी रुग्णालयातून घरी जाण्यास सांगितले जात होते, अशी माहिती या रुग्णाच्या निकटवर्तीयाने दिली. डॉक्टरांच्या संपामुळे हे होत असल्याची त्यांची तक्रार होती. अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर ठेवलेल्या या रुग्णाची दृष्टी गेली आहे. तसेच युरिन बॅग लावलेली आहे, अशी माहिती निकटवर्तीयाने दिली. हा रुग्ण कोकणातील देवगडमधून मुंबईत आणला आहे.

logo
marathi.freepressjournal.in