'तो'पर्यंत निवडणुका घेऊ नका, घेतल्या तर...; जरांगे आक्रमक, आंदोलनाची दिशा ठरली

मोटारसायकल दिली पण पेट्रोल दिलं नाही अशी अवस्था आहे, असे म्हणत मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे-पाटील यांनी राज्य सरकारने मंजुर केलेल्या आरक्षणाच्या विधेयकावर टीका केली.
'तो'पर्यंत निवडणुका घेऊ नका, घेतल्या तर...; जरांगे आक्रमक, आंदोलनाची दिशा ठरली

मोटारसायकल दिली पण पेट्रोल दिलं नाही अशी अवस्था आहे, असे म्हणत मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे-पाटील यांनी राज्य सरकारने मंजुर केलेल्या आरक्षणाच्या विधेयकावर टीका केली. सगेसोयरे अधिसूचनेच्या माध्यमातून मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्याची मागणी करत जरांगे यांनी त्यासाठी सरकारला २ दिवसांचा अल्टीमेटम दिला. अन्यथा २४ फेब्रुवारीपासून आंदोलन सुरु करण्याची घोषणाही जरांगेंनी केली आहे. मराठा समाजाला १० टक्के आरक्षण देण्याचे विधेयक राज्य सरकारने मंजुर केल्यानंतर बुधवारी पत्रकार परिषद घेत जरांगे यांनी आपली पुढील भूमिका स्पष्ट केली.

'सगेसोयरे'ची अंमलबजावणी होईपर्यंत निवडणुका घेऊ नका

सरकारनं सगेसोयरेबाबत जी अधिसूचना काढली होती त्याची अंमलबजावणी व्हायला हवी होती. विशेष अधिवेशन घेऊन सरकारनं काय केले? जर तुम्ही सगेसोयरेबाबतची अंमलबजावणी करून मराठा आरक्षण दिले असते तर १५ दिवस तुमच्या अंगावरचा गुलाल निघाला नसता, अशा शब्दांत जरांगेंनी नाराजी व्यक्त केली. तसेच, आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी निवडणूक आयोगाकडे निवडणुका न घेण्याची विनंतीही केली. 'सगेसोयरे' अध्यादेशाची अंमलबजावणी होईपर्यंत निवडणुका घेऊ नयेत, अशी मागणी त्यांनी निवडणूक आयोगाकडे केली. आयोगाने निवडणूक घेतली तर प्रचाराला येणाऱ्या गाड्या ताब्यात घ्या, त्या आपल्या गोठ्यावर न्या. पण या गाड्या फोडू नका, असे आवाहनही त्यांनी मराठा समाज बांधवांना केलं. आमच्या व्याख्येनुसारच सग्यासोयऱ्यांची अंमलबजावणी करा. आम्हाला सरसकट ओबीसीतून आरक्षण द्या, मराठा आणि कुणबी सरसकट एकच करा, अशी मागणी जरांगे यांनी केली आहे.

२४ तारखेपासून रास्ता रोको आंदोलन

२४ तारखेपासून राज्यातील गावोगावी सकाळी १०.३० ते दुपारी १ आणि संध्याकाळी ४ ते ७ या वेळेत दोन सत्रांत रास्ता रोको होईल. त्यानंतर ३ मार्च रोजी महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत एकाच ठिकाणी एकाच वेळी दुपारी १२ ते १ वाजेपर्यंत रास्ता रोको केला जाईल, असे ते म्हणाले. हा रास्ता रोको जगातील सर्वात मोठा असेल, असे जरांगे यांनी सांगितले. तसेच, २४ ते २९ तारखेपर्यंत सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी केली नाही तर मराठा समाजातील वृद्धांना उपोषणाला बसवायचे आहे. आंदोलनादरम्यान वृद्धांचा मृत्यू झाला तर सरकार जबाबदार राहणार आहे. आपल्या राज्यात २५ ते ३० लाख वृद्ध असतील. माझ्या आई-बाबासह सर्व वृद्ध उपोषण करतील, असेही ते म्हणाले.

१२ वीच्या विद्यार्थ्यांना त्रास नको

२४ फेब्रुवारीपासून आम्ही रास्ता रोको आंदोलन करणार असून एकाही नेत्याने आमच्या घरापर्यंत येऊ नये, आमच्या वावरातून कुणीही जाऊ नये, असे म्हणत त्यांनी सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना इशाराच दिला आहे. सध्या १२ वीची परीक्षा सुरू झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची अडचण होणार नाही याची काळजी घ्या. गरज भासली तर तुम्ही तुमच्या गाड्यांनी विद्यार्थ्यांना परीक्षास्थळी पोहोचवा, असे आवाहनही त्यांनी समाज बांधवांना केले.

दरम्यान, जरांगेंनी आता पुन्हा आंदोलनाची हाक दिल्यामुळे राज्यातील मराठा आरक्षणाचा लढा तीव्र होण्याची शक्यता आहे.

logo
marathi.freepressjournal.in