'ईडीने चुकीची कारवाई केली तर घाबरू नका, उलट....'; उद्याच्या चौकशीआधी रोहित पवारांचे कार्यकर्त्यांना आवाहन

महाराष्ट्र शिखर बँकेशी निगडीत कथित घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचलनालयाने (ED) 24 जानेवारी रोजी म्हणजेच उद्या ईडी कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले आहे.
'ईडीने चुकीची कारवाई केली तर घाबरू नका, उलट....'; उद्याच्या चौकशीआधी रोहित पवारांचे कार्यकर्त्यांना आवाहन
@RRPSpeaks

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना महाराष्ट्र शिखर बँकेशी निगडीत कथित घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचलनालयाने (ED) 24 जानेवारी रोजी म्हणजेच उद्या ईडी कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले आहे. यावर रोहित पवार यांनी यापूर्वी जसे सहकार्य केले, तसेच आताही अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करणार असल्याचे म्हटले. तसेच, "माझ्या कुटुंबासाठी आणि कोवळ्या वयातील मुलांसाठी तर हे घाणेरडे राजकारण न समजण्याच्या पलीकडचे आहे", असेही रोहित म्हणाले.

कुणीही घाबरू नका, उलट...

रोहित पवार म्हणाले की, "सध्याचं सुडाचं राजकारण बघता सर्वच यंत्रणांवर सरकारचा प्रचंड दबाव असल्याने याच दबावाखाली माझ्याबाबत #ED ने काही चुकीची कारवाई केली तर कुणीही घाबरून जाऊ नये उलट आदरणीय पवार साहेबांसोबत आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान जपणाऱ्या व संविधानावर विश्वास असलेल्या प्रत्येक व्यक्तीसोबत सर्वांनी एकजुटीने उभं रहावं. कारण आपल्याला कुणापुढंही न झुकता महाराष्ट्राचा स्वाभिमानी बाणा टिकवायचाय आणि महाराष्ट्र धर्म जपायचाय!." रोहित यांनी त्यांच्या 'एक्स'हँडलवर याबाबतची पोस्ट केली आहे.

ते पुढे म्हणाले की, "माझ्या कुटुंबासाठी आणि कोवळ्या वयातील मुलांसाठी तर हे घाणेरडे राजकारण न समजण्याच्या पलीकडचे आहे. तरीही सर्वजण खंबीरपणे माझ्यासोबत आहेत. शिवाय उद्या खा. सुप्रियाताई आणि स्वतः आदरणीय पवार साहेबही येत आहेत. वय झालं म्हणून काय झालं? वय झालेली माणसं तरुणांना संधीही देतात आणि प्रसंगी बाप माणूस म्हणून ढाल बनून उभीही राहतात. माझ्यासाठी तर हे भारावणारं आहे. या वयातही महाराष्ट्राचा हा सह्याद्री कणखरपणे पाठीशी उभा राहत असेल तर आणखी काय हवंय!", असे रोहित पवार म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in