मनसे फोडायचा विचारही करू नका; राज ठाकरेंनी सामंतांना सुनावल्याची चर्चा

मुंबई : शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्रातील मनसेच्या जिल्हाध्यक्षांना उद्योग मंत्री उदय सामंत यांनी फोनाफोनी केल्याचे समोर आले. या घडामोडीनंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सामंत यांना दादर येथील शिवतीर्थ निवासस्थानी बोलवून घेत, मनसे फोडायचा विचारही करू नका, अशा शब्दांत खडेबोल सुनावल्याची माहिती सूत्रांनी दिली.
Raj Thackeray
संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्रातील मनसेच्या जिल्हाध्यक्षांना उद्योग मंत्री उदय सामंत यांनी फोनाफोनी केल्याचे समोर आले. या घडामोडीनंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सामंत यांना दादर येथील शिवतीर्थ निवासस्थानी बोलवून घेत, मनसे फोडायचा विचारही करू नका, अशा शब्दांत खडेबोल सुनावल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, सामंत यांनी माध्यमांशी संवाद साधताना राजकारणापलीकडील विषयांवर चर्चा झाल्याचे सांगत सारवासारव केली.

भाजप आणि राज ठाकरे यांची जवळीक असल्याचे भाजप नेत्यांच्या भेटीनंतर समोर आले आहे. राज ठाकरे यांच्या भेटीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेल्याने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत पाल चुकचुकली. त्यात आगामी मुंबई महापालिका निवडणुका लक्षात घेता राज ठाकरे यांचे महत्त्व वाढले आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत मराठी वोटर कार्ड मुख्य मुद्दा ठरणार असून त्यासाठी शनिवारी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते मंत्री उदय सामंत यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दरम्यान, पुण्यात विश्व मराठी संमेलन झाले होते. त्यावेळी संमेलनाला मराठी भाषेचा मंत्री म्हणून राज ठाकरेंना उपस्थित राहण्याची विनंती केली आणि ते उपस्थित राहिले, त्यांनी मार्गदर्शन केले. मात्र त्यांची माझी भेट झाली नव्हती. त्यामुळे त्यांचे आभार मानण्यासाठी आलो होतो, असे उदय सामंत यांनी राज ठाकरे यांच्या भेटीनंतर स्पष्ट केले.

लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला होता. मात्र विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी एकला चलो रे ची भूमिका घेतली. विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना पराभवाचा सामना करावा लागला. या निवडणुकीत मनसेला एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही. मात्र आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत राज ठाकरे यांची गरज लक्षात घेता भाजप नेत्यांनी आतापासूनच राज ठाकरे यांना गळ घालण्यास सुरुवात केली आहे. भाजपला मुंबई महापालिकेत एक हाती सत्ता मिळाली तर शिवसेनेचे तीन तेरा वाजणार याचे संकेत शिंदेंच्या शिवसेनेला मिळाले आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांना आपल्या बाजूने वळते करण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेने पाऊल उचलल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुका जाहीर झाल्या नसल्या तरी निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी आतापासून शिंदेंच्या शिवसेनेने मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. त्यामुळे राज ठाकरे यांची मंत्री उदय सामंत यांनी भेट घेतल्याची चर्चा आहे.

मनसे-सेना एकत्र येणार?

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राज ठाकरे यांना आपल्या बाजूने वळते करण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेने एक पाऊल पुढे टाकले आहे. मात्र मनसे आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना एकत्र येणार का, याबाबत एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे निर्णय घेतील, असे उदय सामंत यांनी स्पष्ट केले.

logo
marathi.freepressjournal.in