शरद पवारांचे नाव, फोटो वापरण्यास बंदी; सुप्रीम कोर्टाने अजितदादांना फटकारले

सुप्रीम कोर्टाचे अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला शरद पवार यांचे नाव, फोटो वापरणार नाही, असे स्पष्ट आणि बिनशर्त हमीपत्र देण्याचे निर्देश
शरद पवारांचे नाव, फोटो वापरण्यास बंदी; सुप्रीम कोर्टाने अजितदादांना फटकारले
Published on

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर अजित पवार गटाने शरद पवार यांचे नाव आणि छायाचित्रे वापरल्याबद्दल गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना चांगलेच फटकारले. सुप्रीम कोर्टाने अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला शरद पवार यांचे नाव, फोटो वापरणार नाही, असे स्पष्ट आणि बिनशर्त हमीपत्र देण्याचे निर्देश गुरुवारी दिले.

त्यावर उत्तर देताना अजित पवार यांनी स्पष्ट केले की, त्यांच्या गटाने आता शरद पवार यांचे नाव व छायाचित्र वापरणे थांबवले असून आता ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे नाव आणि छायाचित्र वापरत आहेत.

राष्ट्रवादी पक्षात फूट पडल्यानंतर अजित पवार गटाने शरद पवार यांचे नाव आणि छायाचित्र वापरल्याबद्दल शरद पवार यांनी सर्वोच्च न्यायालयात तक्रार दाखल केली होती. गुरुवारी न्यायालयाने अजित पवार यांना या प्रकरणी उत्तर देण्यास सांगितले.

आता यशवंतराव चव्हाणांचे नाव - अजित पवार

बारामती येथे पत्रकारांशी संवाद साधताना अजित पवार म्हणाले की, त्यांनी महाराष्ट्रातील भाजप-शिवसेना सरकारसोबत आघाडी केल्यानंतर त्यांच्या पक्षाने शरद पवार यांचे नाव आणि प्रतिमा वापरण्यास सुरुवात केली, पण शरद पवार यांनी त्यांच्या फोटो आणि नावाच्या वापरावर आक्षेप घेतल्यानंतर आणि कारवाईचा इशारा दिल्यानंतर आम्ही त्यांचे नाव आणि फोटो वापरणे बंद केले. आम्ही आता यशवंतराव चव्हाण या सुसंस्कृत नेत्याचे फोटो वापरत आहोत आणि लोकांपर्यंत जात आहोत.

logo
marathi.freepressjournal.in