मुंबई : लोकसभा निवडणुकीत बाजी मारणाऱ्या मविआतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाने विधानसभा निवडणुकीची जोरदार तयार केली आहे. अजितदादा गटाच्या आमदारांना पुन्हा पक्षात घेणार नाही, असे वक्तव्य करणारे राष्ट्रवादीचे प्रमुख (शरदचंद्र पवार गट) शरद पवार यांनी अजितदादा गटांच्या काही आमदारांसाठी पक्षाचे दरवाजे किलकिले केले आहेत. अजितदादांसोबत गेलेल्या सर्व आमदारांना प्रवेश बंदी नाही, असे सूतोवाच करून शरद पवार यांनी अजितदादांना धक्का देण्याचे ठरवल्याचे कळते.
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला केवळ एक जागा मिळाली. त्यामुळे तीन महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीत आपले पानिपत होऊ शकते, अशी भीती राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) आमदारांना आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पवार यांनी विधानसभा निवडणुकीत अजितदादांसोबत गेलेल्या सर्वच आमदारांना प्रवेशबंदी नसल्याचे स्पष्ट केले.
येत्या निवडणुकीत पक्ष नव्या चेहऱ्यांना संधी देणार आहे. पक्षाकडे अनेक चेहरे उमेदवारीसाठी येत असून जास्तीत जास्त नव्या चेहऱ्यांना संधी देऊ. अजित पवार गटातील आमदार आमच्यासोबत यायला इच्छुक आहेत. अनेक आमदारांनी शरद पवारांची भेटदेखील घेतली आहे.
पावसाळी अधिवेशन तोंडावर आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात निधीवाटप पूर्ण झाल्यानंतर येऊ, असे आश्वासन आमदारांनी दिल्याचे शरद पवारांनी सांगितले.
राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवारांसोबत जाणाऱ्या आमदारांची संख्या जास्त होती. मात्र, शरद पवारांवर टीका करणाऱ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे इतरांचा विचार केला जाईल, अशा प्रकारचे सूचक वक्तव्य त्यांनी केले.
अजितदादांना मोठा धक्का बसण्याची शक्यता
लोकसभा निवडणुकीतील निराशानजक कामगिरीनंतर टीकेच्या केंद्रस्थानी असलेल्या अजित पवार यांना यामुळे मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. अजितदादा गटातील आमदार महाविकास आघाडीच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत नव्या जोमाने उतरण्याच्या तयारीत असलेल्या अजित पवार यांच्या मनसुब्यांना धक्का बसू शकतो.