सोलापुरात प्रणिती शिंदेंविरोधात डॉ. ज्योतीताई वाघमारेंना उमेदवारी?

सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. या मतदारसंघात २०१४ व २०१९ या लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसचे दिग्गज उमेदवार व माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सुमारे दीड लाखाच्या मताधिक्याने विजयी झाले होते.
सोलापुरात प्रणिती शिंदेंविरोधात डॉ. ज्योतीताई वाघमारेंना उमेदवारी?

विशेष प्रतिनिधी/मुंबई

महाराष्ट्रात लक्षवेधी असलेल्या सोलापूर लोकसभा मतदारसंघात माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आ. प्रणिती शिंदे यांच्या विरोधात महायुतीच्या उमेदवाराचा शोध अंतिम टप्प्यात आला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप पक्षश्रेष्ठींकडून पुण्याचे पद्मश्री मिलिंद कांबळे यांचे नाव निश्चित झाल्याचे बोलले जात आहे. तथापि, स्थानिक कन्नड, तेलगू भाषिक उमेदवार आणि पद्मशाली समाजाला स्थान या मुद्द्यांवर शिंदे शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या प्रा. डॉ. ज्योतीताई वाघमारे यांना कमळ चिन्हावर मैदानात उतरविले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. या मतदारसंघात २०१४ व २०१९ या लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसचे दिग्गज उमेदवार व माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सुमारे दीड लाखाच्या मताधिक्याने विजयी झाले होते. सध्या काँग्रेसने सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आ. प्रणिती ज्या तीन वेळा विधानसभेवर निवडून आलेल्या आहेत त्यांची येत्या लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी निश्चित केली आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघात प्रथमच काँग्रेसने महिला उमेदवार दिला असल्याकारणाने त्यांच्या विरोधात डॉ. वाघमारे यांच्यासारख्या सक्षम महिला उमेदवार दिल्यास ही लढत भारतीय जनता पक्षास सोपी होईल, असे गणित मांडले जात आहे. सोलापूर मतदारसंघातील मतदारांचा कल हा स्थानिक उमेदवार असला पाहिजे याकडे आहे.

सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा बहुभाषिक आहे‌. येथे प्रामुख्याने तेलुगू, कन्नड भाषिकांची संख्या सर्वाधिक आहे व त्यात तेलुगू भाषिक मतदार संख्या सुमारे पाच लाखांहून अधिक आहे. शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या प्रा. ज्योतीताई वाघमारे या उच्च विद्याविभूषित असून त्यांच्या आक्रमक वक्तृत्वशैलीबद्दल त्या प्रसिद्ध आहेत. प्रा. वाघमारे या अनुसूचित जाती प्रवर्गातील मोची समाजाच्या असून त्यांच्या समाजासह इतर समाजाचे सुद्धा त्यांना पाठबळ आहे. त्या तेलुगू, कन्नड या अस्खलित बोलतात. त्यामुळे सोलापुरात तेलुगू व कन्नड भाषेमध्ये त्या मतदारांवर प्रभाव पाडू शकतात. या सर्व जमेच्या बाजू असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस डॉ. वाघमारे यांना कमळ चिन्हावर मैदानात उतरविण्याच्या तयारीत असल्याचे सूत्रांनी सांगितले. ही जागा भाजपची आहे.

logo
marathi.freepressjournal.in