
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान करणारे अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाने त्यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
सोलापूरकर यांचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. एका मुलाखतीत बोलताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दत्तक घेण्यात आल्याचे वक्तव्य सोलापूरकर यांनी केले आहे. त्यांचे हे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ते टीकेचे लक्ष्य बनले आहे. ‘याप्रकरणी सोलापूरकर यांनी माफी मागावी’, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि रिपाईं खरात गटाचे नेते सचिन खरात यांनी केली आहे.
यापूर्वी अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानानंतर संपूर्ण राज्यातून संतप्त प्रतिक्रिया आल्या. 'छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून लाच देऊन निसटले होते. त्यांनी मिठायांच्या पेटाऱ्यांचा वापर केला नव्हता. आग्र्याहून सुटकेसाठी महाराजांनी लाच दिल्याचे पुरावे आहेत,' असे वक्तव्य सोलापूरकर यांनी केले होते. यावरून राज्यभर संतापाची लाट उसळल्यानंतर सोलापूरकरांनी दिलगिरी व्यक्त केली होती. हे प्रकरण ताजे असतानाच आता त्यांनी डॉ. आंबेडकर यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्याने ते पुन्हा टीकेचे लक्ष्य झाले आहेत.
काय म्हणाले सोलापूरकर?
रामजी सकपाळ नावाच्या एका बहुजन घरात जन्माला आलेला एक भीमराव, जो एक आंबवडेकर नावाच्या एका गुरुजींकडून दत्तक घेतला जातो आणि त्यांचेच नाव घेऊन नंतर भीमराव आंबेडकर म्हणून मोठा होतो. त्याने प्रचंड अभ्यास केल्यामुळे वेदांमध्ये जसे म्हटले आहे. ‘सब ब्रम्ह जानेती इति ब्राह्मण:’ म्हणजे अभ्यास करुन तो मोठा झालेला आहे. तसे त्या अर्थाने वेदानुसार भीमराव आंबेडकर ब्राम्हण ठरतात, असे वक्तव्य सोलापूरकर यांनी केले आहे.
सोलापूरकर यांनी मागितली माफी
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून राहुल सोलापूरकर यांच्यावर जोरदार टीका होऊ लागल्यानंतर त्यांनी व्हिडीओच्या माध्यमातून माफी मागितली आहे. ‘छत्रपती राजर्षी शाहु महाराजांची भूमिका करताना त्यात एक प्रसंग होता. कोण कुठल्या घरात जन्माला आला यावर त्याची जात ठरत नाही, तर तो काय करतो यावर त्याची जात ठरते. या न्यायाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासाने इतके विद्वान होते की त्या अर्थाने ते ब्राह्मण ठरतात, असे आपण म्हटल्याचे स्पष्टीकरणही माफी मागताना सोलापूरकर यांनी दिले आहे.