
सुजित ताजणे/छत्रपती संभाजनगर
डॉ. आसावरी टाकळकर यांचा प्रवास खऱ्या अर्थाने स्त्रीसमोरची आव्हाने सतत बदलत असतात हे दाखवतो. आर्थिक अडचणी, आरोग्य सेवा अभाव, समाजातील गैरसमज या सर्व अडथळ्यांवर मात करणे शक्य आहे. त्यांचे कार्य हा एक आदर्श आहे. वैद्यकीय सेवा ही केवळ व्यवसाय नसून सामाजिक कर्तव्य, सहवेदना आणि समाजाच्या कल्याणासाठी समर्पित जीवन आहे. डॉ. टाकळकर समाजासाठी प्रेरणास्त्रोत आहेत आणि समाजातील खरी दुर्गा म्हणून ओळखल्या जातात.
छत्रपती संभाजीनगरमधील वैद्यकीय क्षेत्रात डॉ. आसावरी अनुपम टाकळकर यांचा प्रवास प्रेरणादायी ठरतो. अठरा वर्षांपूर्वी, जेव्हा मराठवाडा प्रदेशात महिला त्वचारोगतज्ज्ञ कमी प्रमाणात होत्या, त्या काळात डॉ. टाकळकर यांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता. तब्बल अठरा वर्षे त्यांनी क्लिनिकमध्ये आणि समाजातील आरोग्य सेवेत सातत्याने कार्य करत आपल्या डॉक्टरीपेक्षा बरोबरच समाजसेविकेची जबाबदारी देखील आत्मीयतेने पार पाडत असल्यामुळे त्या इतरांसाठी प्रेरणास्त्रोत ठरत आहेत.
डॉ. टाकळकर यांनी पाच लाखांहून अधिक रुग्णांची तपासणी केली आहे. त्वचारोगांविषयीच्या चुकीच्या समजुती दूर करण्यासाठी त्यांनी सतत जनजागृती केली. ग्रामीण भागातील रुग्णांना योग्य उपचार मिळावेत, यासाठी त्यांनी आयएमएच्या 'आओ गांव चले' प्रकल्पात सक्रिय भूमिका बजावली. गावांचे दत्तक घेऊन आरोग्य तपासणी, औषधोपचार व जनजागृती कार्यक्रम राबवले गेले.
'आयएमए कनेक्ट' उपक्रमांतर्गत मोफत वैद्यकीय सेवा पोहचवली जाते, जिथे डॉक्टरांपर्यंत पोहोचणे कठीण असते. वृद्धाश्रम, अंधशाळा, अनाथालये, ऑटिस्टिक मुलांचे केंद्र आणि ग्रामीण रुग्ण या माध्यमातून उपचार मिळतात. विशेषतः व्हिटिलिगोच्या शस्त्रक्रिया ५०% सवलतीदराने केल्या जातात, ज्यामुळे आर्थिक आधार मिळतो.
डॉ. टाकळकर सामाजिक कार्यातही अग्रभागी आहेत. गारपिटग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत, 'फूड फॉर ऑल' कार्यक्रमांतर्गत दत्तक घेतलेल्या १० कुटुंबांना अन्नधान्य पुरवठा, उन्हाळ्यात गमछा, पाणी बाटल्या, टोपी व पादत्राणे वाटप, हिवाळ्यात १२५-१५० ब्लँकेट्स आणि स्वेटर्स वितरण, अंध लोकांसाठी ब्रेल पुस्तकं व छडी वाटप हे सर्व त्यांच्या कार्याचा भाग आहेत. त्यांच्या या सेवाभावाची दखल घेऊन त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
मात्र त्यांच्यासाठी सर्वात मोठा पुरस्कार म्हणजे रुग्णाच्या चेहऱ्यावर दिसणारे हास्य, समाधान आणि जीवनात झालेली सुधारणा हाच आहे.
महिला डॉक्टरांसाठी मार्गदर्शक
सध्या डॉ. टाकळकर आयएमए महिला डॉक्टर विंगच्या व्हॉईस चेअरमन आणि आयएमएच्या राज्य प्रतिनिधी आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली, महिला वैद्यकीय व्यावसायिक समाजात सक्रिय भूमिका बजावतात. रुग्णांबद्दल सहवेदना ठेवा, सातत्याने कार्य करा, आणि प्रत्येक नागरिकाला आरोग्याचा हक्क जनतेला मिळवून देण्याचा प्रयत्न करा, असा मोलाचा संदेश ते देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक महिला डॉक्टरांनी सामाजिक योगदानाला प्रोत्साहन दिले आहे.