
प्रतिनिधी/मुंबई
लोकसभेची सध्याची निवडणूक देशाच्या लोकशाहीच्या रक्षणासाठी अत्यंत निर्णायक आहे. ही निवडणूक भाजप विरुद्ध इंडिया आघाडी अशी नसून नवफॅसिस्ट शक्तीविरोधातील आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका हिटलरविरोधी असून लोकशाहीच जनतेला खरा न्याय देऊ शकते अशी होती. या विचारांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांनी भूमिका घेतली आहे. त्यामुळे त्यांची भूमिका लोकशाही विरोधी आहे, असा आरोप काँग्रेसचे माजी राज्यसभा खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी केला. महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची प्रकाश आंबेडकरांची भूमिका दुर्दैवी असून ती भाजपला अनुकूल असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीपासून अंतर राखत लोकसभा निवडणुकीत स्वबळावर उमेदवार उभे केले आहेत. वंचितच्या या भूमिकेमुळे मतविभागणी होऊन त्याचा फायदा महायुतीला होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. मुणगेकर यांनी पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीकास्त्र सोडले. तसेच प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेमुळे बौद्ध समाजात तीव्र नाराजी असून लोकशाही, संविधान आणि स्वांतत्र्य वाचवण्यासाठी दलित, वंचित, आदिवासी, आल्पसंख्याक, महिला, मागासवर्गीय या सर्व समाज घटकांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मरण करून इंडिया आघाडीला मतदान करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
“प्रकाश आंबेडकर यांनी सुरुवातीपासून भाजपच्या भूमिकेवर टीका केली होती. भाजप संविधान विरोधी आहे, लोकशाहीविरोधी आहे, अशी भूमिका ते मांडत होते. परंतु प्रत्यक्षात लढण्याची वेळ आली, त्यावेळी त्यांनी भाजपला अनुकूल भूमिका घेतली. महाविकास आघाडीसोबत जागा वाटपाची चर्चा केली. परंतु शेवटी वेगळे लढण्याचा निर्णय घेतला,” असे डॉ. मुणगेकर म्हणाले.
काँग्रेसने वंचितला सन्मानाने वागणूक दिली
“वंचितला २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ४४ लाख मते पडली होती. पण त्यात एमआयएमच्या मतांचा मोठा हिस्सा होता. विधानसभा निवडणुकीत एमआयएम सोबत नसल्याने वंचितच्या मतांमध्ये घसरण होत ही मते २१ लाखापर्यंत खाली आली. लोकसभा निवडणुकीत वंचितमुळे काँग्रेस आघाडीचा ९ जागांवर पराभव झाला तर विधानसभा निवडणुकीत १६ जागांवर पराभव झाला. परंतु वंचितमुळे भाजपच्या एकाही उमेदवाराचा पराभव झालेला नाही. यावरून वंचितची भूमिका ही भाजपला फायदेशीर अशीच ठरलेली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी साततत्याने टीकात्मक विधाने करूनही काँग्रेस पक्षाने त्यांना अत्यंत सन्मानाने १७ मार्च रोजीच्या शिवाजी पार्कवरील इंडिया आघाडीच्या जाहीर सभेला निमंत्रित केले. पण त्यासभेत त्यांनी केलेल्या विधानावरून त्यांची भूमिका साशंक आहे, हे स्पष्ट झाले होते,” असे डॉ. मुणगेकर यांनी सांगितले.