पुणे : देशाच्या कानाकोपऱ्यात टीव्हीचे जाळे पोहचवणारे किमयागार आणि भारतीय अंतराळ क्षेत्रातील अध्वर्यू डॉ. एकनाथ वसंत चिटणीस बुधवारी (दि. २२) सकाळी निधन झाले. ते १०१ वर्षांचे होते. चिटणीस यांच्या निधनाने भारतीय अंतराळ संशोधनाच्या सुवर्ण इतिहासातील एक पान काळाच्या पडद्याआड गेले आहे.
भारताच्या अंतराळ प्रवासाचे शिल्पकार, विक्रम साराभाईंचे निकटचे सहकारी आणि उपग्रह वाहिन्यांच्या माध्यमातून ज्ञानाचा प्रकाश देशाच्या कोपऱ्याकोपऱ्यात पोहोचवण्यात प्रा. एकनाथ वसंत चिटणीस यांचा सिंहाचा वाटा आहे.
१९२५ मध्ये कोल्हापूरमध्ये जन्मलेले प्रा. चिटणीस हे लहान वयात पोरके झाले. पण आजी आणि कुटुंबियांच्या संस्कारांनी आणि आजोबा मल्हार खंडेराव चिटणीस यांच्या “वंडर्स ऑफ स्पेस” या मराठी ग्रंथाने त्यांच्या अंतरिक्षप्रेमाला दिशा दिली. पुणे विद्यापीठातून भौतिकशास्त्रात प्रथम श्रेणीत पदवी घेतल्यानंतर त्यांनी ऑल इंडिया रेडिओमध्ये आकर्षक सरकारी नोकरी नाकारून विज्ञानाचा मार्ग निवडला. फिजिकल रिसर्च लॅबोरेटरीत स्वयंसेवक म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी कॉस्मिक किरणांवरील संशोधनासाठी सेरेन्कॉव्ह काउंटर तयार केला आणि पुढे एमआयटीमध्ये प्रा. ब्रुनो रॉसी यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले. १९६१ मध्ये साराभाईंनी भारतात परत बोलावल्यावर चिटणीस यांनी देशातील पहिली सॅटेलाइट टेलिमेट्री स्टेशन उभारली आणि थुंबा रॉकेट लॉंचिंग स्टेशनची निवड करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. १९६३ मध्ये भारताच्या पहिल्या ‘नाईके अपाचे’ रॉकेटच्या उड्डाणाने त्यांचे स्वप्न साकार झाले.
चिटणीस यांनी १९७५-७६ मध्ये सॅटेलाइट इन्स्ट्रक्शनल टेलिव्हिजन एक्सपेरिमेंटद्वारे नासाच्या उपग्रहाच्या साहाय्याने सहा राज्यांतील २४०० गावांपर्यंत शिक्षण पोहोचले. ‘उपग्रह म्हणजे आकाशातील शिक्षकच ठरला,’ असे ते नम्रतेने म्हणायचे. याच प्रयोगातून पुढे ‘इन्सॅट’ प्रणालीचा पाया रचला गेला आणि भारताच्या डिजिटल युगाची बीजे रुजली. नंतर ते इस्रोच्या स्पेस ॲॅप्लिकेशन सेंटरचे संचालक झाले. निवृत्तीनंतर त्यांनी पुणे विद्यापीठात २५ वर्षे अध्यापन केले. 1985 मध्ये त्यांना पद्मभूषण सन्मान मिळाला. त्यांचा पुत्र डॉ. चेतन चिटणीस यांनाही यंदा पद्मश्री मिळाला आहे.