डॉ. जी. जी. पारिख अनंतात विलीन

गांधीवादी स्वातंत्र्यसैनिक तथा ज्येष्ठ समाजसेवक डॉ. जी. जी. पारिख यांचे गुरुवारी सकाळी पाच वाजता मुंबई येथील त्यांच्या राहत्या घरी वयाच्या १०१ व्या वर्षी देहवसान झाले आहे.
डॉ. जी. जी. पारिख अनंतात विलीन
Published on

मुंबई / पेण : स्वातंत्र्य प्राप्तीनंतर देशात राष्ट्रीय एकात्मता प्रस्थापित करण्यासाठी १९६१ मध्ये युसूफ मेहरअली सेंटरची स्थापना करून मागील सात दशके अविरत सेवा करणारे, देशातील ११ राज्यांमध्ये सेंटरच्या शाखा निर्माण करून हजारो दीनदुबळ्यांचे आधार बनलेले गांधीवादी स्वातंत्र्यसैनिक तथा ज्येष्ठ समाजसेवक डॉ. जी. जी. पारिख यांचे गुरुवारी सकाळी पाच वाजता मुंबई येथील त्यांच्या राहत्या घरी वयाच्या १०१ व्या वर्षी देहवसान झाले आहे.

डॉ. पारिख यांनी ३० डिसेंबर २०२३ रोजी शतायुषी पूर्ण केले होते. त्यांनी देहदानाची इच्छा व्यक्त केली होती.

१९४० साली जी. जी. पारिख मुंबईत आले. सेंट जॉर्ज कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये राहत. तेव्हा ते अवघ्या १६ वर्षांचे होते. त्याच काळात देशात स्वातंत्र्याचा लढा यशाकडे मार्गस्थ झाला होता. १९४२ च्या ७ आणि ८ ऑगस्टला मुंबईत ऑल इंडिया काँग्रेस कमिटीची मीटिंग होती. गांधीजींनी 'छोडो भारत'ची घोषणा दिली. आणि गांधीजींच्या विचारांनी भारावलेले जीजी सक्रियपणे लढ्यात उतरले.

स्वत:च्या कॉलेजमध्ये ब्रिटिशांविरोधात तीन दिवसीय बंद पुकारला. साधारण अठरा-एकोणीस वर्षांच्या जीजींना पहिल्यांदा १० महिन्यांचा तुरुंगवास झाला. पुढे लोकांच्या प्रश्नांसाठी तुरुंग त्यांना नेहमीचे झाले.

१९४७ साली ते स्टुडंट काँग्रेसच्या मुंबई विभागाचे अध्यक्ष होते. ते मूळचे समाजवादी विचारांचे होते. पुढे आपल्या विचारांवर जगण्याचा निर्णय घेतला. लोकांसाठी ते कायम लढत राहिले.

जी.जींनी खादी आणि खादीमागचा विचार स्वत:च्या आयुष्यात भिनवला. १९७० च्या दशकात तर त्यांनी 'Make Khadi a fashion' हा विचार मांडला होता. ३० डिसेंबर १९२४ रोजी सौराष्ट्रमधील (गुजरात) सुरेंद्रनगरमध्ये जन्मलेल्या जीजींनी महाराष्ट्र आपली कर्मभूमी मानली.

पनवेल जवळील कर्नाळा ग्रामपंचायत मधीलतारा आणि बांधनवाडी इथे स्थित असलेली युसुफ मेहरअली सेंटर नावाची ही शाश्वत विकासाची प्रयोगशाळा उभी केली. जी जी पारीखांनी जे जे रुग्णालयाला आपले देहदान करण्याचे ठरविले होते. त्यानुसार त्यांचा देह जे जे रुग्णालयाला सुपूर्द करण्यात येणार असल्याची माहिती जी.जी. पारिखांच्या कुटुंबीयांसह युसुफ मेहरअली सेंटरच्या व्यवस्थापन समितीकडून देण्यात आली.

गोदी कामगारांतर्फे श्रद्धांजली

ज्येष्ठ समाजवादी नेते, एस. एम. जोशी सोशालिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष, देशासाठी तुरुंगवास भोगलेले, गांधीजींचे अनुयायी, मेहर अली सेंटरच्या माध्यमातून आजतागायत देशहिताचे कार्य करणारे डॉ. शांती पटेल यांचे जवळचे स्नेही स्वातंत्र्यसैनिक डॉ. जी. जी. पारिख यांना मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष ॲड. एस. के. शेट्ये, जनरल सेक्रेटरी सुधाकर अपराज, कार्याध्यक्ष डॉ. यतीन पटेल आणि सर्व पदाधिकारी तसेच सर्व बंदर व गोदी कामगारांतर्फे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

logo
marathi.freepressjournal.in