

मुंबई : भाजपचे राज्यसभेतील खासदार डॉ. गोपछडे यांनी शासनाकडे सादर केलेल्या निवेदनांवर राज्याच्या मुख्य सचिवांना ४१ आढावा बैठका घेण्यास भाग पाडून एक प्रकारे नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.
नांदेडच्या डॉ. गोपछडे यांनी सादर केलेल्या निवेदनांचा आढावा घेण्यासाठी मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी १ ते ४ जून दरम्यान बैठकांचे आयोजन केले आहे. संपूर्ण राज्य प्रशासनाचे नेतृत्व करणाऱ्या आणि २५० हून अधिक समित्यांचे प्रमुख असणाऱ्या मुख्य सचिवांना राज्य योजनांची जलद अंमलबजावणी आणि केंद्र सरकारसोबत योग्य समन्वय साधण्यासाठी, या राज्यसभा खासदाराच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच या बैठका लावण्यास भाग पाडले असल्याचे मानले जात आहे.
डॉ. गोपछडे यांनी सादर केलेली सर्वाधिक ५१ निवेदने आरोग्य विभागाशी संबंधित आहेत. गृह विभागाशी संबंधित ४७ निवेदने आहेत. १ जून रोजी, २१ विभागांशी संबंधित बैठका सकाळी ११ ते दुपारी १ वाजेदरम्यान सात वेगवेगळ्या सत्रांत एकत्र केल्या जातील. २ जून रोजी आठ विभागांच्या बैठका सकाळी ११ ते दुपारी १२.१५ या वेळेत चार सत्रात होतील. ३ आणि ४ जून रोजी प्रत्येकी सहा विभागांच्या बैठका पुन्हा सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत घेतल्या जातील.
मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या सांगण्यानुसार, एकाच खासदारासाठी मोठ्या संख्येने आढावा बैठका घेतल्या जाणे दुर्मिळच आहे. संबंधित विभागांचे सचिव, तसेच संयुक्त आणि उपसचिव, आयुक्त, संचालक आणि जिल्हाधिकारी यांनी सविस्तर उत्तरांसह तयार राहणे अपेक्षित आहे.
अनेक मुद्दे प्रलंबित
मोठ्या आढावा बैठकीबाबत अधिकाऱ्याने सांगितले की, मुख्यमंत्री आणि मुख्य सचिव दोघांनाही सादर केलेल्या अनेक निवेदनांद्वारे डॉ. गोपछडे यांनी युक्तिवाद केला की, विविध विभागांकडे सातत्याने पाठपुरावा करूनही २०२४ ते २०२६ दरम्यान त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर कोणतीही दाद किंवा प्रतिसाद मिळाला नव्हता.